
Ravichandran Ashwin : दोन दिवस टिच्चून मारा करणाऱ्या अश्विनने कुंबळेला टाकले मागे तर लायनशी केली बरोबरी
Ravichandran Ashwin Test Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या कसलेल्या गोलंदाजीचा चांगलाच घाम काढला. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 180 धावांची दमदार खेळी केली तर कॅमरून ग्रीनने 114 धावांची खेळी करत त्याला चांगला साथ दिला. नॅथन लायन (34) आणि टॉड मर्फी (41) यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.
मात्र कांगारूंच्या दमदार फलंदाजीला एकटा अश्विन भिडताना दिसला. त्याने फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर देखील त्याने दोन दिवसात तब्बल 4.2 म्हणजे जवळपास 50 षटके गोलंदाजी करत फक्त 90 धावा देत 6 बळी टिपले. त्याची इकॉनॉमी ही 1.90 इतकी कमी होती. या दमदार कामगिरीबरोबरच अश्विनने दोन माईल स्टोन देखील पार केले. अश्विनने भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेला देखील मागे टाकले.

आयसीसी कसोटी रँकिंगमधील अव्वल स्थानावर असलेला गोलंदाज आर. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 32 व्यांदा 5 विकेट्स घेण्याची करमात केली. त्याने हा माईल स्टोन 41 धावा करून भारताला टेन्शन देणाऱ्या टॉड मर्फीला बाद करत पार केला.
याचबरोबर अश्विनने भारताचा दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा मायदेशात 25 वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील मागे टाकला. अश्विन फक्त 5 विकेट्स घेऊन थांबला नाही. त्यानेच 34 धावांची झुंजार खेळी करणाऱ्या नॅथन लायनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपवला.
या जोडीला अश्विनने नॅथन लायनच्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी देखील केली. आता अश्विन आणि लायन हे देघे प्रत्येकी 113 विकेट्स घेत बॉर्डर - गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत संयुक्तरित्या अव्वल स्थान पटकावले.
अश्विनने यंदाच्या बॉर्डर - गावकर ट्रॉफीमध्ये दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने पहिल्या नागपूर कसोटीत 37 धावात 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता. अश्विन आता मायदेशात सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेणाऱ्या मुथय्या मुरलीधरन (45) याच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे.
अश्विनने दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कांगारूंनी वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या सत्रात ग्रीन आणि अॅलेक्स कॅरीने अवघ्या 4 चेंडूंच्या अंतराने बाद केले. याचबरोबर मिचेल स्टार्कला देखील 6 धावांवर बाद करत दुसरे सत्र भारताच्या बाजून केले.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण