
Ravindra Jadeja Controversy : रविंद्र जडेजा अडचणीत? Viral Video वरून सामनाधिकाऱ्यांनी केली चौकशी
Ravindra Jadeja Controversy : भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने तब्बल पाच महिन्यानंतर पुनरागमन करत पाच विकेट्स घेण्याची किमया साधली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी कांगारूंचा संघ 177 धावात गारद झाला. यात रविंद्र जडेजाने 47 धावात 5 बळी घेत मोठे योगदान दिले. मात्र आता हाच रविंद्र जडेजा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सामनाधिकाऱ्यांनी त्याने केलेल्या एका कृतीबद्दल त्याला विचारणा केली असून जडेजा अडचणीत सापडला आहे.
रविंद्र जडेजा गोलंदाजी करत असताना त्याच्या बोटाला कोणतेतरी लोशन लावत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनेक माजी क्रिकेटपटूंनी विशेषकरून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शेअर केला आहे.
यात मोहम्मद सिराजच्या मनगटावर एक प्रकारचे लोशन लावले होते. ते लोशन जडेजा आपल्या बॉलिंग फिंगरला लावत असल्याचा हा व्हिडिओ आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांनी जडेजा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माला याबाबत विचारणा केल्याचे वृत्त इएसपीएलक्रिकइन्फो ने दिले आहे. यावेळी सामनाधिकाऱ्यांनी व्हिडिओ देखील पाहिला. मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघ व्यवस्थापनाने पायक्रॉफ्ट यांना सांगितले की रविंद्र जडेजा आपल्या बॉलिंग फिंगरवर पेन किलर लोशन लावत होता. जडेजा मोठ्या ब्रेकनंतर कसोटी सामना खेळत आहे. मोठ्या ब्रेकनंतर फिरकीपटू गोलंदाजी करत असताना घर्षणामुळे फोड येत असतात. जडेजा जुलै 2022 पासून कसोटी सामना खेळला नव्हता. तो गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत होता.