गंभीरच्या विकेटमागे पॉंटिंगचा अदृश्य हात ?

ggz.jpg
ggz.jpg

आयपीएलच्या अकराव्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाची कामगिरी फारशी चांगली झालेली नाहीये. एका आठवड्यानंतर दिल्लीचा संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर आहे, यापाठोपाठ दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सोडून स्वगृही परतलेल्या गौतम गंभीरने दिल्लीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत मुंबईकर श्रेयस अय्यर दिल्लीचा नवा कर्णधार असणार आहे. संघ प्रशासन, मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. “आतापर्यंत दिल्लीच्या संघाने जी काही कामगिरी केली आहे, त्याची कर्णधार या नात्याने मी जबाबदारी स्विकारतो आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये मी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मी माझ्या फलंदाजीकडे अधिक लक्ष देऊ शकेन. श्रेयस अय्यर संघाचा नवीन कर्णधार असेल. माझ्यामते आगामी सामन्यात आम्ही चांगला खेळ केला तर आम्ही अजुनही स्पर्धेत कायम राहू शकतो.” गंभीरने राजीनाम्यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. पण, गंभीरचं पायउतार होणं वरवर वाटतं, तितकं साधं नसल्याची शंका अनेकांच्या मनात आहे कारण मागील काही गोष्टींचा इतिहास पहिला तर ते सहज लक्षात येते. 

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि शिखर धवन यांना ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांमुळे कर्णधारपद सोडावं लागलं होतं. गौतम गंभीरच्या  राजीनाम्यामागेही तेच कारण असल्याचं बोललं जातंय. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दिल्लीचा प्रशिक्षक आहे. गंभीरच्या 'विकेट'मागे त्याचा अदृश्य हात असू शकतो, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू आहे. कारण, आयपीएलच्या सगळ्याच पर्वांमध्ये दिल्लीची कामगिरी साधारणच राहिलीय. पण, कधी कुणी राजीनामा दिल्याचं आठवत नाही. मग अचानक यावेळीच गंभीरचा राजीनामा कसा घेतला? ऑस्ट्रेलिया विजयासाठी काहीही करू शकते, हे अनेकदा आपण पाहिलंय. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि  भारतीय कर्णधारांचे सूत कधीच जुळलेलं नाही असे आपणाला आढळून येईल. यापूर्वी २००९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या कर्णधारपदावरून गांगुलीला बाजूला करण्यात जॉन बुकॅनन यांची मोठी भूमिका होती. २०१४ मध्ये शिखर धवननं मधेच हैदराबादचं कर्णधारपद सोडलं होतं. तेव्हाही हैदराबादचे प्रशिक्षक होते ते टॉम मुडी अर्थात ते ही ऑस्ट्रेलियाचेच. गंभीरच्या बाबतीतही हे झालं असणार, असं सगळ्यांना वाटतंय. रिकी पाँटिंगला पराभव पचवता येत नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असताना, पराभव दिसू लागताच तो सैरभैर व्हायचा. रडीचा डाव खेळायलाही मागे-पुढे पाहायचा नाही. त्यामुळे कुठे तरी पाँटिंगच्या दबावाखालीच गंभीरने हा निर्णय घेतला नाही ना, अशी शंका येऊ लागते. 

आता दिल्लीला उर्वरित ८ पैकी ७ सामन्यांत विजय मिळवून दिल्ली उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहू शकते. यासाठी २३ वर्षीय श्रेयसला संघाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागणार आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने संघाला शेवटपर्यंत विजयाची आशा दाखवली होती. मात्र अवघ्या ५ धावांनी दिल्लीच्या पदरी निराशा पडली. तंदुरुस्तीच्या बाबतीतही दिल्लीचे नशीब त्यांच्यासोबत नाही असेच म्हणावे लागेल. जेसन रॉय आणि ख्रिस मॉरिस दोघेही अनुक्रमे ताण व पाठदुखीमुळे संघाबाहेर आहेत. रॉयच्या नाबाद ९१ धावांमुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवलेला एकमेव विजय वगळता दिल्लीने प्रत्येक सामन्यात कच खाल्ली आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजीतदेखील अमित मिश्रा आणि शाहबाज नदीम यांनी ट्रेंट बोल्टला साथ देणे आवश्यक आहे.

राजीनाम्यानंतर गंभीरने पगारही नाकारला

संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर गौतम गंभीरने आयपीएलमधील खराब कामगिरीची जबाबदारी घेऊन स्वतःचं २ कोटी ८० लाख रुपयांचं वेतन न घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या कर्णधाराने खराब कामगिरी केल्यामुळे पगार न घेण्याचा निर्णय घेण्याची ही कदाचीत आयपीएलमधील पहिलीच घटना असू शकते. तो दिल्लीच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळण्यासाठी पैसे घेणार नाही. हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. गौतम गंभीर असा व्यक्ती आहे ज्याच्यासाठी सन्मान मह्त्त्वाचा आहे, त्याला पैसे घ्यायची इच्छा नाहीये आणि हा त्याचा स्वतःचा निर्णय आहे. आता एक खेळाडू म्हणून उर्वरित सामन्यांसाठी गंभीर उपलब्ध असेल मात्र, आयपीएल संपल्यानंतर तो आपल्या भविष्याबाबत निर्णय घेणार आहे अशी माहिती मिळली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com