पंतांचा पराक्रम; मोडला माहीचा विक्रम

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

रिषभ पंतने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 65 धावांची नाबाद खेळी केली. याबरोबरच त्याने मातब्बर वरिष्ठ सहकारी महेंद्रसिंह धोनीचा उच्चांक मोडला.

जॉर्जटाऊन (गयाना) : रिषभ पंतने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात 65 धावांची नाबाद खेळी केली. याबरोबरच त्याने मातब्बर वरिष्ठ सहकारी महेंद्रसिंह धोनीचा उच्चांक मोडला.

भारतीय यष्टिरक्षकाने या प्रकारात नोंदविलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी धोनीने 2017 मध्ये बंगळूरमध्ये इंग्लंडविरुद्ध 56 धावांची खेळी केली होती. याशिवाय 22 वर्षांचा होण्यापूर्वी या प्रकारात दोन अर्धशतके काढलेला पंत पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.

दीपकही लक्षवेधी
दीपक चहरने 3-1-4-3 अशी कामगिरी केली. भारतातर्फे या प्रकारातील षटकामागे 1.33 धावा हा दुसऱ्या क्रमांकाचा इकॉनॉमी रेट ठरला. भुवनेश्‍वर कुमारने 2014 मध्ये ढाक्‍यात 3 षटकांत 3 धावा दिल्या होत्या. त्याचा षटकामागे एका धावेचा इकॉनॉमी रेट सर्वोत्तम आहे.

पाकचा उच्चांकही पार
भारताने वेस्ट इंडिजला सलग सहाव्या टी20 सामन्यात हरविले. याबरोबरच भारताने विंडीजवरील सलग पाच विजयांचा पाकिस्तानचा उच्चांक मोडला. भारताने यापूर्वी 2018-19 मोसमात मायदेशातील मालिकेत 3-0 असे धवल यश संपादन केले होते.

...आणि विंडीजचा नीचांक
वेस्ट इंडिजला टी20 मध्ये 113 सामन्यांत 57वा पराभव पत्करावा लागला. यामुळे सर्वाधिक पराभवांच्या निचांकाशी बरोबरी झाली. बांगलादेशचे 85 सामन्यांत 57 पराभव आहेत. यामध्ये टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये निकाल लागलेल्या लढतींचा समावेश नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rishabh Pant breaks MS Dhonis record in 3rd T20 against West Indies