
भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेसह उप-कर्णधार रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू मुंबईत परतले आहेत.
मुंबई : ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाला क्वारंटाईनच्या नियमातून सूट द्यावी, यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि बीसीसीआयसह आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे. युएईच्या मैदानात आयपीएलसाठी रवाना झाल्यापासून संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय खेळाडू जैव सुरक्षिततेच्या वातावरणात आहेत. भारतीय संघाचा कार्यवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेसह उप-कर्णधार रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू मुंबईत परतले आहेत.
विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मोठ्या दौऱ्यावरुन परतलेल्या खेळाडूंची कोरोनाची प्राथमिक चाचणी घेऊन त्यांना घरी जाण्याची मुभा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घ्यावा, अशी विनंती शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेतल्याचेही समजते.
ऑस्ट्रेलियातील क्वारंटाईनमुळे भारतीय खेळाडू अस्वस्थ झाल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. अस्वस्थेतून मार्ग काढत ऑस्ट्रेलियातील सर्व निमांचे पालन करुन टीम इंडियाने दौरा फत्तेह केला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरणार आहे. दोन आठवड्यांनी यासाठी त्यांना पुन्हा कँम्पमध्ये सामील व्हावे लागेल. त्यामुळे ऐतिहासिक कामगिरीनंतर कुटुंबियासोबत वेळ घालवता यावा, म्हणून खेळाडूंना कोरोनाच्या कठोर नियमातून शिथिलता देण्यात आलीय.