IND vs SA : अखेरच्या सामन्यात राहुल-विराटला विश्रांती, टीम इंडिया आफ्रिकेला करणार क्लीन स्वीप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SA

IND vs SA : अखेरच्या सामन्यात राहुल-विराटला विश्रांती, टीम इंडिया आफ्रिकेला करणार क्लीन स्वीप?

IND vs SA : गेल्या अर्धा डझन सामन्यात तरी आम्ही डेथ ओव्हरमध्ये अपयशी ठरलो आहोत, अशी कबुली आता कर्णधार रोहित शर्माने दिली आहे. ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना त्यात जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त असताना रोहित शर्माने व्यक्त केलेली चिंता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज होत आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ थेट विश्वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे. मात्र डेथ ओव्हरमधील गोलंदाजीचा प्रश्न वाढतच चालला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात २३७ धावांचे संरक्षण करताना दमछाक झाली होती. अखेर अवघ्या १६ धावांनी विजय मिळाला आणि मालिकेत विजयी आघाडी घेता आली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर आणि हर्षल पटेल यांची पाठराखण केली होती, आता मात्र या अपयशाबद्दल उघडपणे बोलला आहे.

डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणे सोपे नसते; परंतु गोलंदाजीत आम्ही त्याच चुका करत आहोत. एकदमच चिंता करण्यासारखी परिस्थिती नसली तरी यात सुधारणा करणे गरजेचे आहे, असे रोहित म्हणाला.

राहुल, विराटला विश्रांती

इंदूरमधील होळकर मैदानावर उद्या होणाऱ्या अखेरच्या सामन्यातून केएल राहुल आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर उद्याचा सामना खेळणार हे निश्चित आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत पॅड बांधून तयार राहाणाऱ्या रिषभ पंतला फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे उद्या तो रोहितसह सलामीला खेळेल. विराटचा फॉर्म भारतीय संघाला सुखावणारा आहे.

आशिया करंडक स्पर्धेपासून त्याने १० सामन्यांत १४१.७५ च्या स्ट्राईक रेटने ४०४ धावा केल्या आहेत. विराटच्या ठिकाणी श्रेयय अय्यर असा एक बदल केल्यानंतर राहुलच्या ठिकाणी कोणाला संधी दिली जाते, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. महम्मद सिराज आणि शहाबाझ अहमद यापैकी एकाची वर्णी लागू शकते. तसेच अश्विनऐवजी युझवेंद्र चहल असाही बदल अपेक्षित आहे.