esakal | Ind vs Eng: "मला माहिती होतं..."; दमदार शतकानंतर रोहितची खास प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Sharma-PC

"मला माहिती होतं..."; दमदार शतकानंतर रोहितची खास प्रतिक्रिया

sakal_logo
By
विराज भागवत

नक्की कोणत्या गोष्टीबद्दल बोलला हिटमॅन, वाचा सविस्तर

Ind vs Eng 4th Test: भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीत शतक झळकावले. भारताबाहेर हे त्याचे पहिलेच कसोटी शतक ठरले. कसोटी क्रिकेटमधील अपयशामुळे रोहित शर्मा काही काळ टीम इंडियातून बाहेर होता. पण नंतर त्याला कसोटीमध्ये सलामीवीराची संधी मिळाली आणि त्याने ती जागा कायमची आपल्या नावे केली. इंग्लंडविरूद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेत त्याच्या डावाची सुरूवात दोन वेळा चांगली झाली होती, पण अर्धशतकाचे शतकात रूपांतर करणं त्याला जमलं नाही. एकदा ८३ तर एकदा ५९ धावांवर तो बाद झाला. पण शनिवारी अखेर त्याने शतकांचा दुष्काळ संपवला. शतक ठोकत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. या शतकानंतर रोहितने एक खास प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: INDvsENG: आदमी एक और पराक्रम ५.. शतकवीर 'हिटमॅन'चा नादच खुळा

काय म्हणाला 'टीम इंडिया'चा हिटमॅन?

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहितने पत्रकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी रोहितने शतकाबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "मी खेळत असताना माझ्या मनात विचार सुरू होते. मला माहिती होतं की कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी ही माझी कसोटी क्रिकेटमधील शेवटची संधी असणार आहे. कसोटी संघात सलामीवीर म्हणून खेळण्याबद्दल जेव्हा मला ऑफर देण्यात आली तेव्हा मला पूर्ण कल्पना होती की आता ही संधी गमावून चालणार नाही. कारण मिडिया आणि संघ व्यवस्थापन यांच्या माझ्या सलामीबद्दल प्रचंड चर्चा सुरू होती."

"संघ व्यवस्थापन मला कसोटीमध्येही कधी ना कधी सलामीला जायला सांगेल याची मला पूर्ण खात्री होती. तसंच घडलं. त्यामुळे जेव्हा ती वेळ आली तेव्हा माझी सलामीवीर म्हणून खेळण्याची मानसिक तयारी झाली होती. मी मधल्या फळीत फलंदाजी करून पाहिली होती, पण त्यावेळी माझी कामगिरी अपेक्षेइतकी चांगली होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे मला नक्की माहिती होतं की सलामीवीर म्हणून खेळणं ही कसोटी क्रिकेटमधील माझी शेवटची संधी आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला जे हवंय ते करण्यास मी तयार झालो.

हेही वाचा: रोहितने मोडला द्रविडचा विक्रम; ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान

दरम्यान, रोहितच्या दमदार शतकाने भारताचा डाव सावरला आणि तिसऱ्या दिवसावर वर्चस्व गाजवले. रोहितने २५६ चेंडूंचा सामना संयमी खेळी केली. त्याच्या १२७ धावांच्या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. विशेष म्हणजे, तो एकमेव षटकार त्याने शतक पूर्ण करण्यासाठीच लगावला होता. रोहितच्या शतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद २७० पर्यंत मजल मारली आणि दुसऱ्या डावात १७१ धावांची आघाडी घेतली.

loading image
go to top