वाईट बातमी! रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह, टीम इंडियाला इंग्लंडमध्ये मोठा झटका | Rohit Sharma Covid Positive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma Covid Positive

वाईट बातमी! रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह, टीम इंडियाला इंग्लंडमध्ये मोठा झटका

Rohit Sharma Covid Positive: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामन्यांमध्ये सर्वांनी पाहिले की रोहित शर्मा पहिल्या दिवशी फलंदाजीला आला, पण दुसऱ्या डावात तो दिसला नाही. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सराव सामन्यात फलंदाजीसाठी का उतरले नाही हे स्पष्ट केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा सध्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. याआधी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनही कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नव्हता. आता तो बरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात लंडनमध्ये पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता तोही बरा आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा हा एक भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला गेला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे.