एकही मिनीट न खेळल्याने रोनाल्डोविरुद्ध याचिका

पीटीआय
सोमवार, 29 जुलै 2019

दक्षिण कोरियात येऊन केवळ राखीव खेळाडूंतच बसल्याबद्दल फुटबॉल चाहते ख्रिस्तियानो रोनाल्डोला न्यायालयात खेचणार आहेत. चाहत्यांनी मागणी केल्यानंतरही रोनाल्डो मैदानात उतरला नाही आणि संतप्त चाहत्यांनी रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीचा जयजयकार केला.

सोल :दक्षिण कोरियात येऊन केवळ राखीव खेळाडूंतच बसल्याबद्दल फुटबॉल चाहते ख्रिस्तियानो रोनाल्डोला न्यायालयात खेचणार आहेत. चाहत्यांनी मागणी केल्यानंतरही रोनाल्डो मैदानात उतरला नाही आणि संतप्त चाहत्यांनी रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीचा जयजयकार केला.

युरोपातील क्‍लब सध्या मोसमपूर्व लढती विविध देशात खेळत आहेत. त्याचाच भाग म्हणून रोनाल्डोचा युव्हेंटिस सोलमध्ये के लीग ऑल स्टार संघाविरुद्ध सराव सामना खेळला. रोनाल्डो खेळणार असल्यामुळे 65 हजार क्षमतेचे विश्वकरंडक स्टेडियम हाऊसफुल्ल होते; पण रोनाल्डो मैदानात उतरलाच नाही.

युव्हेंटिस सोलमध्ये खेळणार असल्याची घोषणा झाली, त्या वेळी रोनाल्डो किमान 45 मिनिटे मैदानात असेल, असा करार झाला होता. त्यामुळे चाहत्यांनी तिकिटांसाठी गर्दी केली. 25 ते 338 डॉलरपर्यंत असलेली सर्व तिकिटे अडीच तासात संपली.

चाहत्यांची फसवणूक केल्याबद्दल किमान दोन हजार तिकीटधारकांनी रोनाल्डोविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे. याबाबत पुढील आठवड्यात याचिका सादर करण्यात येईल. आपल्याला नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी चाहत्यांची मागणी आहे.

युव्हेंटिस कोरियातील लढत खेळण्यापूर्वी चीनमध्ये खेळले. त्यामुळे युव्हेंटिसचा संघ लढतीपूर्वी पाच तास अगोदरच कोरियात आला होता. त्यामुळे लढत एक तास उशिरा सुरू झाली. फेस्टा या कोरियातील संस्थेने ही लढत घेतली होती. त्यांच्या सीईओ रॉबिन झॅंग यांनी याबाबत निराशा व्यक्त केली. रोनाल्डोने मैदानात यावे यासाठी आम्ही युव्हेंटिसला वारंवार विनंती केली; पण तो मैदानात आलाच नाही. आता चाहत्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ronaldo fan may sue him