प्रतिकूल परिस्थितीत रोशनचे यश

संजय घारपुरे - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे लक्ष्य आहे. ज्याद्वारे मला रिकर्व्ह स्पर्धेकडे वळता येईल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश मिळाल्यास त्या स्पर्धेसाठीचे धनुष्य घेण्यास मदत होईल. राष्ट्रीय वरिष्ठ स्पर्धांतही पदक जिंकण्याचा माझा प्रयत्न असेल.
- जागृती कुंदे

सातारा - वडील पॅरालिसिसमुळे आजारी, त्यांची पेन्शन हेच घरातील उत्पन्नाचे साधन; पण राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तरच प्रगती होईल, या उद्देशाने रोशन सोळंके राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याने इंडियन राउंड प्रकारात थेट सुवर्णपदकाचा वेध घेतला.

राष्ट्रीय कुमार स्पर्धेपूर्वी विद्यापीठ स्पर्धा झाली. ही स्पर्धा संपवून रोशन इंडियन राउंड स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडेतीनला साताऱ्यात आला होता. त्यानंतर त्याची स्पर्धा साडेआठला होती. त्यामुळे तो क्रमवारीच्या फेरीत सोळाव्या क्रमांकावर गेला; पण त्याची भरपाई त्याने वैयक्तिक स्पर्धेत केली आणि त्याच्यापेक्षा तीन सरस मानांकन असलेल्या तिघांना त्याने हरवले. 

रोशन हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांदेश्‍वरचा. सदानंद जाधव यांच्या एकलव्य अकादमीत तो मार्गदर्शन घेतो. त्यांनीच दिलेल्या साधनांचा वापर करून तो यश मिळवतो. आईने काल त्याला नीट लक्ष देऊन यश मिळव, असे सांगितले. आता तिला यशाची बातमी कळवणार आहे. तिला नक्कीच आनंद होईल. माझ्या पहिल्या राष्ट्रीय विजेतेपदाने ती नक्कीच खूश होईल, असे त्याने सांगितले. राष्ट्रीय स्पर्धेतील पदकाचीच नव्हे, तर सुवर्णपदकाची अपेक्षापूर्ती झाली. नववीत शिकत असलेल्या जागृती कुंदे हिनेही इंडियन राउंड प्रकारातच ब्राँझपदक जिंकले. 

स्पर्धा निकाल ः
इंडियन राउंड - मुले ः १) रोशन सोळंके, २) वभव पाल सिंग (सेनादल), ३) अनुप सिंग (उत्तराखंड). मुली ः १) पीनल सुवेरा (गुजरात), २) चिरॉम देबिया देवी (मणीपूर), ३) जागृती कुंदे.  रिकर्व्ह - मुले ः १) यशदेव आर्य, २) अतुल वर्मा (दोघेही सेनादल), ३) प्रवीण जाधव. मुली ः १) अंकिता भगत (झारखंड), २) गुंजन कुमारी (चंडीगड), ३) अर्विरा दत्ता (आसाम). कंपाउंड - मुले ः १) के रॉबर्ट सिंग (सेनादल), २) जे रमेश आदित्य (तमिळनाडू), ३) शिवांश अवस्थी (मध्य प्रदेश). 

Web Title: Roshan success