Pro Kabaddi : धावण्याचा व्यायाम देई प्रो-कबड्डीला आयाम

पुणेरी पलटण खेळाडूंसाठी सुसज्ज-संघटित होण्याला नाही विराम
Running exercise gives dimension Pro-Kabaddi Puneri Paltan Sangram Manjrekar
Running exercise gives dimension Pro-Kabaddi Puneri Paltan Sangram Manjrekarsakal

पुणे : वेगवेगळ्या खेळांच्या लिगमध्ये कमी कालावधीत जास्त सामने खेळावे लागतात. त्यामुळे तंदुरुस्तीचा बिंदू कमाल लागतो. मॅटवर होणाऱ्या प्रो कबड्डी लिगनंतर या खेळातील तंदुरुस्तीचे आयाम बदलले. पुणेरी पटलणचे तंदुरुस्ती प्रशिक्षक (फिटनेस कोच) संग्राम मांजरेकर यांनी कबड्डीपटूच्या तंदुरुस्तीसाठी धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, मोसमापूर्वी, मोसम सुरु असताना सुद्धा तंदुरुस्तीसाठी कबड्डीपटू सुसज्ज-संघटित होत असतात आणि ही प्रक्रिया न थांबणारी असते.अॅथलेटीक्समध्ये धावपटूंना मध्यम-लांब पल्ल्याच्या शर्यतींसाठी अर्धा-एक तास धावावे लागते. कबड्डीत तशी गरज नसते. इथे दमसास महत्त्वाचा असतो. दर ४० सेकंदांनी इथे तुम्हाला काही सेकंद उसंत मिळते. कबड्डीपटूची शरीरयष्टी आणि तंदुरुस्ती अॅथलेटीक्समधील स्प्रींटरप्रमाणे असावी लागते.

मांडी तसेच पायाच्या स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी स्नायू भक्कम लागतात. त्यासाठी वेट ट्रेनिंगला पर्याय नसतो, मात्र दमसास वाढविण्यासाठी धावणे आवश्यक ठरते. आमचा खेळ अनएरोबिक प्रकारात मोडतो. इथे एनर्जी झोन असतात. कमी जागेत जास्त वेगाने आणि ताकदीने आक्रमण करावे लागते. बचावाच्यावेळी हे समीकरण आणखी आव्हानात्मक बनते. त्यासाठी आम्ही सूक्ष्म पद्धतीने धावणे, स्प्रिंट आणि चपळता वाढविणे (अॅजिलीटी) अशा तीन बाजूंचा विचार करतो. २० ते ४० मीटर अंतरावर कोन ठेवून धावण्याचा सराव केला जातो. कबड्डीत दिशा बदलून, अंग फिरवून खेळावे लागते. त्यामुळे धावण्याचा सरावही तशा पद्धतीने केला जातो. मॅटवर खेळताना स्नायूंची ताकद पणास लागते. अशावेळी तेथील स्नायूंचा समूह बळकट करावा लागतो आणि त्यात चपळाई सुद्धा लागते. अशावेळी वेट ट्रेनिंग आणि धावणे अशा दोन्ही गोष्टी उपयुक्त ठरतात.

मोसम सुरु झाल्यानंतर आठवड्यातून एकदा धावण्याचा व्यायाम केला जातो. त्यावेळी विश्रांती आणि पुन्हा सज्ज होणे (रेस्ट-रिकव्हरी) आवश्यक असते. तंदुरुस्तीवर ताण देऊन चालत नाही. मोसमात काही दिवसांचा कालावधी मिळाला तर आम्ही आठवड्यातून दोन सत्रांत धावण्याचे नियोजन करतो. मोसमाच्याआधी आठवड्यातून तीन वेळा स्ट्रेंथ-कंडिशनिंग केले जाते. एका दिवसाआड हे होते. तेव्हा धावण्यातून वरील तीन बाजूंनी तंदुरुस्ती भक्कम केली जाते.मांजरेकर यांनी पुढे सांगितले की, संघात एखादा खेळाडू नवा आला तर त्याच्या तंदुरुस्तीवर मेहनत घ्यावी लागते. प्रारंभी त्याला १५-२० किमी धावण्याचे लक्ष्य द्यावे लागते.

आधी नुसताच धावायचो : अस्लम

पुणेरी पलटणचा प्रमुख खेळाडू अस्लम इनामदार याने सांगितले की, टाकळीभान येथे मी आधी नुसताच धावायचो. तंदुरुस्तीसाठी काय करावे लागते, याची फारशी माहिती नव्हती. युट्यूब व्हिडिओ पाहून थोडी माहिती मिळाली. त्यावेळी कोन वगैरे साहित्य नसायचे. अशावेळी काही अंतरावर दगड ठेवून धावायचो. प्रो कबड्डीमध्ये आल्यानंतर शास्त्रीय माहिती मिळाली. वेग, चपळता हे पैलू कळले. दुखापती टाळत कसे धावायचे आणि कसे खेळायचे हे सुद्धा कळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com