esakal | अमेरिकेतील क्रमवारीत टेनिसपटू ऋतुजा दुहेरीत चौथी 
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेतील क्रमवारीत टेनिसपटू ऋतुजा दुहेरीत चौथी 

अमेरिकेतील क्रमवारीत टेनिसपटू ऋतुजा दुहेरीत चौथी 

sakal_logo
By
मुकुंद पोतदार

पुणे - पुण्याची टेनिसपटू ऋतुजा भोसले हिने अमेरिकेतील दुहेरीच्या आंतरमहाविद्यालयीन दुहेरीच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. रशेल पिअर्सन हिच्या साथीत तिने ही कामगिरी केली. विद्यापीठाच्या इतिहासात ती सर्वोच्च ठरली आहे. 

ऋतुजा शेवटच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. "इंटरकॉलेजिएट टेनिस असोसिएशन'ची (आयटीए) क्रमवारी तीव्र चुरशीने ठरते. रशेलने 2015 मध्ये इव्हा पाल्मा हिच्या साथीत पाचव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. हा उच्चांक तिने ऋतुजाच्या साथीत मोडला. ऋतुजाने एकेरीच्या क्रमवारीतही 28 क्रमांक झेप घेत "टॉप हंड्रेड'मध्ये स्थान मिळविले. ऋतुजा-रशेल यांच्या कामगिरीमुळे टेक्‍सासने "साउथइस्टर्न कॉन्फरन्स' (एसइसी) केंटुकीवर 4-2 अशी मात केली. गेल्या आठवड्यात त्यांनी सहावे स्थान मिळविले होते. 24 विजय आणि आठ पराभव अशी त्यांची कामगिरी होती. ऋतुजाने एकेरीत 18 विजय-11 पराभव, तर दुहेरीत 12 विजय-8 पराभव अशी कामगिरी केली आहे. तीन बहुतांश सामने दुसऱ्या क्रमांकावर खेळली आहे. 

ऋतुजाने फेब्रुवारीच्या प्रारंभी "एसईसी'चा "आठवड्यातील सर्वोत्तम खेळाडू' (प्लेयर ऑफ दी विक) हा पुरस्कार पटकावला होता. तिच्या कामगिरीमुळे टेक्‍सासला राष्ट्रीय सांघिक इनडोअर स्पर्धेत स्थान मिळाले होते. ऋतुजाने तेव्हा एकेरी व दुहेरी मिळून सर्व सहा सामने जिंकले होते. 

अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये भारतीय टेनिसपटू खेळतात. पुरुषांमध्ये महेश भूपती, सोमदेव देववर्मन, साकेत मायनेनी यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महिलांमध्ये एकेरीत तारा अय्यरने "टॉप टेन'मध्ये स्थान मिळविले होते. त्यानंतर दुहेरीतील ऋतुजाची कामगिरी सर्वोत्तम मानली जात आहे. 

अमेरिकेतील विद्यापीठाचे निमंत्रण येण्यापूर्वी ऋतुजा पीवायसी हिंदू जिमखान्यावर हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायची. तिला महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) "व्हिजन' उपक्रमानुसार पाठिंबा मिळाला. या उपक्रमाची संकल्पना आखून ती तडीस नेलेले व सध्या सरचिटणीस असलेले सुंदर अय्यर म्हणाले, की "टेनिसमध्ये "करिअर' होऊ शकते. त्याचवेळी खेळाच्या जोडीला शैक्षणिक कारकीर्दही घडविता येते, याचे उदाहरण ऋतुजाच्या रूपाने पुढे आले आहे. टेनिसपटू असल्यामुळे तिला शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे वर्षाला 20 लाख फी व पाच लाख बाकीचा खर्च असे चार वर्षांचे सुमारे एक कोटी रुपये वाचले, असे म्हणता येईल.' 

ऋतुजाचे वडील संपतराव महाराष्ट्र पोलिस दलात अधिकारी आहे. त्यांनी सांगितले, की "ऋतुजाला अमेरिकेत पाठविण्याचा निर्णय घेताना खूप विचार करावा लागला; पण आता चार वर्षांत तिच्या व्यक्तिमत्त्वात सर्वच पातळ्यांवर झालेली प्रगती पाहून आनंद वाटतो. मे महिन्याच्या अखेरीस ती भारतात परत येईल. त्यानंतर ती व्यावसायिक कारकीर्द सुरू करेल.' 

loading image