कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही, विराटच्या वाट्याला तेच आलं |Virat Kohli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli And KL Rahul
कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही, विराटच्या वाट्याला तेच आलं

कधी कोणती वेळ येईल सांगता येत नाही, विराटच्या वाट्याला तेच आलं

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्यामुळे विराट कोहलीवर आता लाडल्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याची वेळ आली आहे. लोकेश राहुल (Lokesh Rahul) हा विराटच्या पहिल्या पसंतीचा खेळाडू असल्याचे मागील काही वर्षांपासून दिसून आले. त्यामुळेच लोकेश राहुलला विराटचा (Virat Kohli) लाडला असल्याचे बोलले जायचे.

2013 नंतर पहिल्यांदाच कोहली धोनीनंतर कुणाच्यातरी नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. मागील नव वर्षात लोकेश राहुल हा विराट कोहलीचा दुसरा कॅप्टन असेल. कोहलीशिवाय अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवन (Shikhar Dhavan) या तिघांनी मागील काही वर्षात वेगवेगळ्या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. पण या तिघांच्या नेतृत्वाखाली विराट कधीच खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत या तिघांनी आतापर्यंत कॅप्टन्सी केल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: Cristiano Ronaldo च्या नव्या वर्षाची सुरुवात नाराजीनं

टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कोहलीच्या पदरी निराशा

भारतीय क्रिकेटमध्ये कोहली हा सर्वोच्च दर्जाचा खेळाडू आहे. यात कोणतीही शंका नाही. बीसीसीआय प्रशासनाच्या नजरेतही त्याचा एक वेगळा वट होता. पण टी-20 वर्ल्ड कपनंतर सूत्रे फिरली. टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर त्याच्याकडून वनडे संघाचे नेतृत्व अक्षरश: काढून घेण्यात आले. ही गोष्ट त्याच्या मनाविरुद्धच झालीये. त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

कोहली अन् वाद

विराट कोहलीनं ज्यावेळी टी-20 संघाचे नेतृत्व सोडले त्यावेळी वनडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वपदी कायम राहिन, असे तो म्हणाला होता. पण बीसीसीआयने त्याच्याकडून वनडे संघाचे नेतृत्व काढून घेतले. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोहलीमुळेच हा निर्णय घ्यावा लागला असे ते म्हणाले आहेत. आयसीसीच्या स्पर्धा सोडल्या तर कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा आलेख उत्तम राहिला आहे. त्यामुळे अनेकांना बीसीसीआयचा हा निर्णय खटकलाही आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा: Video : जिथं हॅप्पी न्यू इयरचं पहिलं सेलिब्रेशन तिथंच पहिली सेंच्युरी

लोकेश राहुल अनुभव आणि वयानं कोहली पेक्षा छोटा

लोकेश राहुल अनुभवाने आणि वयानेही कोहलीपेक्षा खूपच छोटा आहे. 29 वर्षीय राहुलनं 2016 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दुसरीकडे 33 वर्षीय कोहलीने 2008 मध्ये आपला पहिला वनडे सामना खेळला होता. दोघांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध हे अंतर कमी करतील आणि राहुल उत्तमपणे काम करेल, असे वाटते. पण पुढे काय घडणार हे येणारा काळच ठरवेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top