नवा 'बेंचमार्क'!

रविवार, 28 ऑक्टोबर 2018

सुनील गावसकर एकदा समालोचन करताना म्हणाले होते, ‘विराटकडं बघा... कुठंही शर्ट लोंबत नाहीये... पॅडच्या पट्ट्याही व्यवस्थित बांधल्या आहेत... त्याच्या ‘अपियरन्स’कडे नीट पाहा... हा अत्यंत ‘परफेक्‍ट’ माणूस आहे!’ धावांचा रतीब घालणारा, स्टाइल आयकॉन आणि विक्रमांचा बादशाह अशी अनेक बिरुदंही ज्याला कमी पडतील, तो विराट कोहली! हेवा वाटेल असं यश त्यानं मिळवलंय; शिवाय त्याला पाहून आज युवा खेळाडू घडताहेत... गेल्या पिढीसमोर सचिन तेंडुलकरनं असा आदर्श निर्माण केला होता... विराटनं आता नवा ‘बेंचमार्क’ निर्माण केलाय!

आपण क्रिकेट ‘पाहणारा’ देश आहोत... क्रिकेट पाहण्यासाठी आपल्याला एका ‘हिरो’ची गरज असते... गेल्या पिढीसाठी हा ‘हिरो’ सचिन होता... या पिढीसाठी ही जागा विराटनं घेतली आहे. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे २००८च्या ऑगस्टमध्ये विराटनं आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिलं पाऊल टाकलं. त्यानंतर त्यानं इतक्‍या झपाट्यानं प्रगती केली, की ‘हा खेळाडू खरंच महान आहे,’ एवढेच शब्द सुचतात. विराट सध्या २९ वर्षांचा आहे. त्याचा भन्नाट फिटनेस पाहता आणखी काही वर्षं तरी खेळण्याची त्याची क्षमता नक्कीच आहे. 

‘कोहली = क्रिकेट’ असं सध्याचं समीकरण झालं आहे. कोहलीच्या विक्रमांची, खेळीची चर्चा सतत होतच असते आणि पुढंही होत राहील, पण त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे... सुरवातीला तापट असलेला विराट कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बदलला. त्याच्या मूळ स्वभावावर नियंत्रण ठेवत आता तो त्याच्या सहकाऱ्यांमध्येही तितकीच ऊर्जा निर्माण करण्यासाठी झटतो... विराटचा जोश, जल्लोष हा ‘संसर्गजन्य’ असतो म्हटलं, तर अतिशयोक्ती ठरू नये. मैदानात संघाला बांधून ठेवणं आणि ‘टीम स्पिरीट’ टिकवून ठेवणं हे कर्णधाराचं महत्त्वाचं काम असतं आणि त्यात विराट यशस्वी होताना दिसत आहे...

डंकन फ्लेचर भारताचे प्रशिक्षक होते, तेव्हाची गोष्ट! त्यांनी फिटनेससंदर्भात विराटला घाम गाळण्यास भाग पाडले. याला मूर्त स्वरूप आलं २०१५ नंतर! आता त्याच्या फिटनेसबद्दल सतत चर्चा होत असते. सामन्याच्या पहिल्या षटकात खेळायला आला, तरीही ५० व्या षटकातही तो तितक्‍याच चपळाईनं धावा घेत असतो. 

रन मशिन..!
धावांचा अक्षरशः रतीब घातलाय कोहलीनं... केवळ २०५ डावांमध्ये विराटनं एकदिवसीय सामन्यांत दहा हजार धावा केल्या आहेत! दहा हजार! त्याच्या शतकांची सरासरी पाहिली, तर दर साडेपाच डावांनंतर त्यानं एक शतक झळकावलं... शतकांची शतकं करणाऱ्या सचिननं दर ९.२ डावांनंतर एक शतक झळकावलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीसारखा दुसरा खेळाडू नाही, असंच आता चित्र आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यात ऑस्ट्रेलियाचा मायकेल बेव्हन तज्ज्ञ मानला जात असे. सुरवातीला कोहलीलाही ‘हा बेव्हनसारखा खेळतो’ असं म्हटलं जात असे, पण आता त्याच्या भन्नाट सातत्यामुळं ‘पाठलाग करावा तो फक्त विराटनंच,’ असं म्हटलं जाऊ लागलं आहे. कोहलीनं एकूण ३७ शतकं झळकाविली आहेत आणि त्यापैकी तब्बल २२ शतकं ही धावांचा पाठलाग करतानाची आहेत, यावरून त्याची हुकमत लक्षात यावी. त्याच्या दहा हजार धावांपैकी ६० टक्के धावा या दुसऱ्या डावातीलच आहेत. हे झालं फक्त वन-डे क्रिकेटमधलं. कसोटीमध्येही त्यानं २४ शतकं झळकावत तिथेही झेंडा रोवला आहे. 

स्टाइल आयकॉन..!
आक्रमक स्वभाव असेल किंवा ‘स्टार’ पत्नी अनुष्कासोबतच्या नात्यामुळं असेल, विराट हा सध्याचा देशातील ‘स्टाइल आयकॉन’ आहे. भर मैदानात प्रेम व्यक्त करणारा विराट हा तरुणाईचा आदर्श नसता, तरच नवल होतं... स्वतःच्या खेळाबाबत तो जितका संवेदनशील आहे, तितकाच स्टाइलबद्दलही आहे. सतत केशभूषा किंवा वेशभूषेत काही ना काही बदल करत राहिल्यानंही तो चर्चेत असतो. आता ‘दाढी’ ही त्यानं नव्यानं ‘ट्रेंड’मध्ये आणली आहे. फार लांब नाही... गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वीचा भारतीय संघ आठवून पाहा... क्वचित कधीतरी सौरभ गांगुली किंवा महेंद्रसिंह धोनी वगळला, तर कुणीही दाढी कधी राखली नव्हती. कोहलीनं ही स्टाइल आणली आणि सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी किती जण दाढी राखतात, हे पाहा..! कोहलीचा ‘इम्पॅक्‍ट’ मैदानावर आणि मैदानाबाहेर कसा आहे, हे लगेच लक्षात येईल.

भारताला १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विजय मिळवून देणारा विराट २०११मधील जगज्जेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. आता आठ वर्षांनंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताची मदार विराटवर असेल. विक्रमांचा डोंगर रचणाऱ्या विराटनं आता कर्णधार म्हणून भारताला विश्‍वकरंडक जिंकून दिला, तर त्याच्यापर्यंत पोचणं दुसऱ्या कुठल्याही क्रिकेटपटूला शक्‍य होईल, असं वाटत नाही... ‘बेस्ट’चा ‘बेंचमार्क’ आता बदललाय... विराट करेल, त्यापलीकडं जाऊन करणारा कुणीतरी यावा लागंल... भविष्यात असा क्रिकेटपटू येईलही; पण सध्या ‘विराटसम’ कुणीही नाही, हेच खरंय..!

नवा विक्रमादित्य!
विराट कोहली मैदानावर येणे आणि त्याने विक्रम बनविणे हे आता काही नवीन राहिले नाही. विराटच्या चाहत्यांनाही त्याच्या या विक्रमांमागून विक्रम रचण्याची सवय झाली असून, त्याने सतत विक्रम मोडीत काढावेत याची सवयच झाली आहे. आपला आदर्श मानणाऱ्या सचिन तेंडुलकरचे एक-एक विक्रम मोडीत काढण्याचा जणू काही त्याने धडाकाच लावला आहे. विराटच्या दहा हजार धावांच्या वाटचालीतील काही वाचनीय गोष्टी.

सर्वांत वेगवान दहा हजार धावा 
विराटने २१३ एकदिवसीय सामन्यांतील २०५ डावांमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकरपेक्षा ५४ डाव कमी खेळून त्याने ही कामगिरी केली आहे. सचिनने २५९ डावांमध्ये दहा हजार धावा केल्या होत्या.

सर्वाधिक सरासरी
विराटने वनडे कारकिर्दीत दहा हजार धावा करताना अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक सरासरी नोंदविली आहे. जगात दहा हजार धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटची सरासरी ५९.६२ आहे. त्यानंतर भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी (५१.३०) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक्‍स कॅलिस (४५.४५) हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

भारताचे पाच मानकरी
दहा हजार धावा करणाऱ्या जगभरातील खेळाडूंच्या यादीत भारताचे चक्क पाच फलंदाज आहेत. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी ही कामगिरी केलेली आहे. यात धोनीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दहा हजार धावा आहेत. यानंतर श्रीलंकेच्या चार फलंदाजांनी (सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, महेला जयवर्धने) पाकिस्तानच्या इंझमाम उल-हक, दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्‍स कॅलिस, वेस्ट इंडीजच्या ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने अशी कामगिरी केली आहे.

६ हजार धावा दुसऱ्या डावात
विराटने केलेल्या दहा हजार धावांपैकी ६ हजार धावा म्हणजे निम्म्याहून जास्त धावा या दुसऱ्या डावात (पाठलाग करताना) केल्या आहेत. याबाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. सचिनने दुसऱ्या डावात ८७२० धावा केलेल्या आहेत.  यानंतर नंबर लागतो तो वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा  याचा. 

दुसरा युवा फलंदाज
एकदिवसीय कारकिर्दीत १० हजार धावा करणारा विराट हा दुसरा युवा फलंदाज आहे. त्याने २९ वर्षे ३५३ दिवसांत ही कामगिरी केली आहे. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम अबाधित आहे. सचिनने २७ वर्षे ३४१ धावांमध्ये ही कामगिरी केली होती. 

११ डावांमध्ये हजार धावा
विराटने ९ ते १० हजार धावांपर्यंतचा टप्पा फक्त ११ डावांमध्ये पूर्ण केला आहे. त्याने या ११ डावांमध्ये पाच शतके आणि तीन अर्धशतके झळकाविलेली आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ही १४९.४२ इतकी आणि स्टाइक रेट १०३.८७ एवढा राहिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Nikam writes about Virat Kohli records