पाकला नकोसे आर्थर इंग्लंडचे कोच होणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळीतच बाद झालेल्या पाकिस्तानने अपेक्षेनुसार मार्गदर्शक मिकी आर्थर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निरोप देण्याचे ठरवले. त्याच वेळी आर्थर हे विश्वकरंडक विजेत्या इंग्लंडचे मार्गदर्शक होण्याची शक्‍यता आहे.

इस्लामाबाद / लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळीतच बाद झालेल्या पाकिस्तानने अपेक्षेनुसार मार्गदर्शक मिकी आर्थर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निरोप देण्याचे ठरवले. त्याच वेळी आर्थर हे विश्वकरंडक विजेत्या इंग्लंडचे मार्गदर्शक होण्याची शक्‍यता आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वी आर्थर यांनी पाकिस्तान क्रिकेटच्या प्रगतीसाठी संघनेतृत्वात बदल करण्याची सूचना केली होती. पण त्यानंतर काही तासांतच पाक मंडळाने आर्थर; तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना निरोप दिला.

आर्थर 2016 पासून पाकचे मार्गदर्शक होते. त्यांच्याच कालावधीत पाकने चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली; तसेच जागतिक क्रिकेट क्रमवारीत प्रगतीही केली; पण विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आल्यामुळे आर्थर यांच्यासह फलंदाज मार्गदर्शक ग्रॅंट फ्लॉवर, गोलंदाज मार्गदर्शक अझर महमूद, ट्रेनर ग्रॅंट लुदेन यांना दूर केले. पाकच्या क्रिकेट प्रगतीसाठी नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत पाक मंडळाचे प्रमुख एहसान मणी यांना प्रशिक्षक बदलत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, आर्थर यांना पाकने दूर केल्यामुळे त्यांच्याकडे इंग्लंड संघाचे मार्गदर्शक देण्याच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला असल्याचे मानले जात आहे. सध्याचे इंग्लंडचे मार्गदर्शक ट्रॅव्हर बायलीसीस यांच्याबरोबरील करार ऍशेस मालिकेनंतर संपणार आहे. बायलिसीस यांनी यापूर्वी सनरायजर्स हैदराबादचे मार्गदर्शकपद स्वीकारले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sacked pakistan coach arthur may be england's next coach