
WPL 2023 MIW vs DCW : मुंबईच्या फिरकीपुढे दिल्ली नतमस्तक! इशाक, वँग, मॅथ्यूज त्रिकुटाचा तिहेरी तडाखा
WPL 2023 Delhi Capitals Women vs Mumbai Indians Women : अव्वल स्थानासाठी होत असलेल्या मुंबई - दिल्ली सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने 105 धावात गुंडाळत सामन्यावर पकड निर्माण केली. मुंबईने पॉवप्लेमध्येच टिच्चून मारा करत दिल्लीला थोपवले. मुंबईकडून सैका इशाकने 13 धावात 3, इसी वँगने 10 धावात 3 आणि हेली मॅथ्यूजने 19 धावात 3 विकेट्स घेतल्या. दिल्लीकडून कर्णधार मेग लेनिंगने सर्वाधिक 43 तर जेमिमाह रॉड्रिग्ज तर 25 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्ये चांगलेच जखडून टाकले. मुंबईची फिरकीपटू सैका इशाकने शफाली वर्माचा 2 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर दिल्लीची धावगती मंदावली. त्यांना 5 षटकात 25 धावांपर्यंतच मजल मारता आली.
इशाकने शफाली वर्मा आणि पूजा वस्त्रकारने एलिस कॅप्सीची विकेट घेत दिल्लीची अवस्था 2 बाद 24 अशी केली होती. त्यानंतर वँगने माझीराने कापचा त्रिफळा उडवला. यानंतर मात्र कर्णधार मेग लेनिंग आणि जेमिमाह रॉड्रिग्जने भागीदारी रचत संघाला 13 षटकात 81 धावांपर्यंत पोहचवले. मात्र इशाकने जेमिमाहला 25 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
यानंतर इशाकने आपली तिसरी आणि सर्वात मोठी शिकार केली. तिने दिल्लीची कर्णधार मेग लेनिंगला 43 धावांवर बाद करत दिल्लीची अवस्था 5 बाद 84 अशी केली. दिल्लीचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर हेली मॅथ्यूजने जेस जोनासेनला 2 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला. पाठोपाठ मिनू मनीला शुन्यावर बाद करत दिल्लीची अवस्था 5 बाद 84 वरून 7 बाद 84 अशी केली.
यानंतर इसी वँगने 17 व्या षटकात तानिया भाटिया आणि राधा यादव यांना बाद करत दिल्लीची अवस्था 9 बाद 102 धावा केली. यानंतर मॅथ्यू हेलीने दिल्लीचा डाव 105 धावात संपवला.
हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...