बॅडमिंटन लीगमधून साईनाची माघार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

आपण पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या मोसमातून माघार घेत आहोत, असे साईना नेहवालने जाहीर केले. पोटाचे विकार तसेच दुखापतीमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे तिने सांगितले.

मुंबई : आपण पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या मोसमातून माघार घेत आहोत, असे साईना नेहवालने जाहीर केले. पोटाचे विकार तसेच दुखापतीमुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे तिने सांगितले.

साईनाने कोरिया ओपनमधून दुखापतीमुळे माघार घेतली होती. आता तिने प्रीमियर बॅडमिंटन लीगमधूनही माघार घेतली आहे. या लीगचा लिलाव मंगळवारी दिल्लीत आहे, त्यापूर्वी दोन दिवस तिने आपला निर्णय जाहीर केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी साईना हॉंगकॉंग स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराजित झाली होती. तेव्हापासून तिने एकही लढत खेळलेली नाही.

मला काही महिन्यांपासून पोटाचा विकार होत आहे, तसेच दुखापतीनेही सतावले आहे. त्यामुळे बॅडमिंटन लीगमधून माघार घेत आहे. त्या कालावधीत भविष्यातील महत्त्वाच्या स्पर्धांसाठी पूर्वतयारी करता येईल, असे सांगतानाच या लीगमध्ये खेळणार नसल्याबद्दल चाहत्यांची माफीही मागितली आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगचा पाचवा मोसम 20 जानेवारीपासून सुरू होईल. या लीगमध्ये पहिल्या तीन स्पर्धांत ती अवध वॉरियर्सकडून खेळली होती. गतवर्षी तिला नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सने घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saina withdraw from badminton league