
संजूच्या कारकिर्दित माजी पाक कॅप्टनची लुडबूड; म्हणाला काही आऊटपूटच नाही!
भारताचा प्रतिभावंत विकेटकिपर संजू सॅमसनला रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळाले. त्यानेही श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 सामन्यात 18 चेंडूत 39 धावांची खेळी करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. मात्र संजू सॅमसनवर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट नाखूष आहे. सलमान बटने याबाबत आपल्या यू ट्यूब चॅनेलवरून नाराजी व्यक्त केली आहे. (Salman Butt said Sanju Samson got a lot talent but there is lack of output)
सलमान बट संजू सॅमसनबद्दल आपल्या यू ट्यूब चॅनेलमध्ये म्हणतो की, त्याला भारतीय संघातील (Indian Cricket Team) आपले स्थान पक्के करण्यासाठी मोठा प्रभाव टाकावा लागणार आहे. 'संजू सॅमसन काही अप्रतिम फटके खेळतो. मात्र त्याच्या 18,19,20,30 धावांच्या खेळी फार कामाला येणार नाहीत. त्याच्याकडे नक्कीच प्रतिभा आहे मात्र आऊटपूटची कमतरता आहे. जर त्याला संघातील स्थान पक्के करायचे असेल तर त्याने आपल्या प्रतिभेला मोठ्या कामगिरीची जोड दिली पाहिजे.' असे वक्तव्य केले.
सलमान बट आपल्या व्हिडिओत पुढे म्हणतो की, 'त्याने दीर्घकाळ संघातील स्थान मिळवण्यासाठी चांगल्या धावा केल्या पाहिजेत. दमदार कामगिरी करत अनेक खेळाडू भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहेत. तुम्हाला जर संघात स्थान हवे असेल तर तुम्हाला दर्जेदार कामगिरी करावी लागले. त्यामुळे हा विषय गुणवत्तेचा नाहीच. तुम्ही कशी कामगिरी करता याचा आहे.'