गिफ्टच्या षटकाराचा 'आनंद'; सहा खेळाडूंसाठी 'महिंद्रा' यांचा मास्टर स्ट्रोक

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 23 January 2021

भारताला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या संघातील सहा पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना कंपनीच्या नव्हे तर स्वत:च्या पैशाने आलिशान महिंद्रा कार ते भेट देणार आहेत. 

ऑस्ट्रेलियाच्या मैदानात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघावर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा जाम खूश आहेत. भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केल्यानंतर आता त्यांनी पदार्पणात दमदार कामगिरी करुन भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलणाऱ्या युवा खेळाडूंना बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला अभूतपूर्व यश मिळवून देणाऱ्या संघातील सहा पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना कंपनीच्या नव्हे तर स्वत:च्या पैशाने आलिशान महिंद्रा कार ते भेट देणार आहेत. मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांनी भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या सहा युवा आणि कसोटी पदार्पणात दमदार कामगिरीसंदर्भात आनंद महिंद्रा यांनी खास ट्विट करत गिफ्ट देणार असल्याची माहिती दिली आहे.

क्रिकेटमधील कसोटी प्रकाराबद्दल माझ्या मनात शंका होती. गाबा कसोटी सामना पाहिल्यानंतरम माझ्या मनात एक वेगळा विचार सुरु आहे. टी 10 टिकटॉक सारखे असून टी 20 युट्युब सारखे आहे. वनडे फिचर फिल्म असून कसोटी मास्टर पिस थियटर आहे, असे वर्णन त्यांनी केले होते. 

बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला लाजीरवण्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यानंतर क्रिकेट जाणकारांनी भारतीय संघ मोठ्या फरकाने मालिकेत पराभूत होईल अशी भविष्यवाणी केली होती. भारतीय संघाने ब्रिस्बेनचे मैदान मारुन मालिका जिंकल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली होती. तुम्ही तुमचे शब्द ग्रिल्ड, फ्राईड...चपातीसोबत की डोशासह खाणार का? असा टोला लगावला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salute to anand mahindra Six young men made their debuts in the recent historic series