गरीबीतून थेट आंतराष्ट्रीय स्तरावर झेप, संस्कृतीने जिंकली अनेक पदके

sanskriti wankhede
sanskriti wankhedee sakal
Updated on

नागपूर : सोयीसुविधा आणि अनुकूल वातावरण असेल तरच खेळाडू घडतो असे नाही. प्रतिकूल परिस्थितीतही अनेकांनी गरुडझेप घेतल्याची असंख्य उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. अकोल्याची आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू (International chess day 2021) संस्कृती वानखडे (sanskriti wankhede akola) ही त्यापैकीच एक. संस्कृतीने गरिबी आणि विपरीत परिस्थितीवर मात करत देशविदेशातील स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकून बुद्धिबळाच्या पटावर आपला ठसा उमटविला आहे. (sanskriti wankhede won many trophy in chess competition at international level)

sanskriti wankhede
यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

संस्कृतीचे वडील संघदास हे झेडपी शिक्षक असून, आई भारती गृहिणी आहे. एकुलती एक मुलगी शिक्षणात हुशार व्हावी व अभ्यासात एकाग्रता वाढावी, या उद्‌देशाने पालकांनी तिला तिसऱ्याच वर्षी बुद्धिबळात टाकले. घरात कुणालाही बुद्धिबळ समजत नव्हते. त्यामुळे संघदास यांनी मार्केटमधून पुस्तकं व चेसबोर्ड आणून स्वतः हा खेळ समजून घेतला. त्यानंतर मुलीलाही यातील बारकावे शिकविले. हळूहळू संस्कृतीचीही या खेळात रुची वाढत गेली. मात्र पुढे जाण्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी संस्कृतीला जितेंद्र अग्रवाल यांच्याकडे पाठविले. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक धडे गिरविल्यानंतर संस्कृती अल्पावधीतच अव्वल दर्जाची खेळाडू म्हणून नावारूपास आली.

जिल्हा, विदर्भ, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकत तिने थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. महिला चेस मास्टर असलेल्या वंडरगर्ल संस्कृतीने आतापर्यंत भारतासह श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ऊझबेकिस्तान, ताश्‍कंद, सिंगापूर, थायलंड, मंगोलिया व जॉर्जियामध्ये खेळल्या गेलेल्या विविध वयोगटांतील आशियाई, राष्ट्रकुल व जागतिक स्पर्धांमध्ये असंख्य पदके जिंकून विदर्भ व देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आर्थिक अडचणीमुळे तिला इराण आणि दुबई येथील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर पाणी सोडावे लागले. अन्यथा तिच्या शिरपेचात आणखी दोन सोनेरी यश असते. जागृती विद्यालयात दहाव्या इयत्तेत शिकत असलेली १५ वर्षीय संस्कृती ग्रॅण्डमास्टर विश्‍वनाथन आनंद, कोनेरू हंपी, ज्युडिथ पोल्गर व मॅग्नस कार्लसनसारख्या दिग्गजांना आदर्श मानते. त्यांच्याप्रमाणेच तिलाही बुद्धिबळाचे सर्वोच्च शिखर गाठायचे आहे. तिला प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब मिळवायचा आहे. त्या दिशेने सध्या तिची जिद्दीने वाटचाल सुरू आहे.

'बार्टी'मुळे बदलले संस्कृतीचे "लाइफ'

संस्कृती वानखेडे ही साधारण घरची खेळाडू. आर्थिक परिस्थितीमुळे तिला अनेकवेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून वंचित राहावे लागले. तिची कहाणी ऐकून पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) तत्कालीन महासंचालक डी. आर. परिहार यांनी तिला दत्तक घेत आर्थिक पाठबळ दिले. संस्कृतीला 'ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर' बनविले. तेव्हापासून संस्कृतीचे "लाइफ'च बदलून गेले. संस्कृतीचा जाण्यायेण्याचा संपूर्ण खर्च कित्येक वर्षे बार्टीनेच केला. सेवानिवृत्त झाल्यानंतर परिहार आजही संस्कृतीला नियमितपणे वैयक्तिक मदत करीत असतात, असे संघदास यांनी सांगितले.

' संस्कृती अडीच वर्षांची असताना माझ्याकडे पहिल्यांदा बुद्धिबळ शिकण्यासाठी आली होती. तल्लख बुद्धीच्या संस्कृतीने प्रचंड मेहनत करून लहान वयातच अनेक स्पर्धा जिंकल्या. आशियातील सर्वात कमी वयाची ‘चॅम्पियन’ होण्याचा बहुमान तिने पटकावला. संस्कृतीमध्ये असलेली गुणवत्ता बघून नक्कीच भविष्यात ती आपले ग्रॅण्डमास्टरचे स्वप्न पूर्ण करेल, यात अजिबात शंका नाही.'
-जितेंद्र अग्रवाल, संस्कृतीचे प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com