साताऱ्याच्या लेकींना ऑलिंपिकवारीचे वेध..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aaditi swami anushka kumbhar and sudeshna shivankar

त्या तिघीही ग्रामीण भागातील आहेत. तिघींची कौटुंबिक पार्श्वभूमीही प्रतिकूलच आहे. अर्थात, तिघीही जिगरबाज आहेत. असाधारण जिद्दीच्या आहेत. त्यांचा प्रवासही संघर्षाचा आहे.

Olympic Competition : साताऱ्याच्या लेकींना ऑलिंपिकवारीचे वेध..!

सुदेष्णा ही जावळी तालुक्यातील खर्शी या गावची. अनुष्का ही सातारा तालुक्यातील वर्णे, तर आदिती शेरेवाडी गावची. सुदेष्णा ही इयत्ता आठवीत असल्यापासूनच धावण्याच्या स्पर्धेकडे वळली. साताऱ्याच्या पॅरेंट स्कूलमध्ये शिकत असताना विशाल सोनावणे या शिक्षकांनी तिला धावण्याच्या स्पर्धेत उतरवले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेक पल्ला मागे टाकत ती पुढेच जात राहिली. महाराष्ट्रानंतर गुजरात, छत्तीसगड, हरियाना, बिहार, तमिळनाडू, आसाम आदी राज्यांत झालेल्या विविध स्पर्धांत तिने भरीव कामगिरी बजावली. कोलंबियातही तिने आपला झेंडा फडकाविला. ‘खेलो इंडिया’त तिने पदके मिळवली आहेत. सुदेष्णा १०० अन् २०० मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात सध्या सराव करत आहे. ऑलिंपिकसाठी ती मेहनत घेत आहे. यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयात दुसऱ्या वर्गात ती शिकते.

अनुष्काच्या कामगिरीचा आलेखही कायम उंचावत राहिलेला आहे. वर्णेतील श्री काळभैरव विद्यालयात असतानाच ती धावण्याकडे वळली. तालुका, जिल्हा, विभाग अशा एकेक पायऱ्या चढत तिने आकाशाला गवसणी घातली आहे. १६ आणि १८ या वयोगटात ती कायम अव्वल राहिली आहे. कुवेतमध्येही पदके जिंकताना तिने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. सध्या ती चारशे मीटर स्पर्धेचा सराव करत आहे. अनुष्का सध्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ‘बीए’च्या दुसऱ्या वर्गात आहे.

आदिती स्वामी बघता बघता तिरंदाजीमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू बनली आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील भारतीय संघात तिचा समावेश झाला आहे. केवळ खेळातच, नव्हे तर अभ्यासातही तिने आपली चुणूक दाखवली आहे. कोरोना काळात संपूर्ण जग स्तब्ध असतानाही आदितीचा तिरंदाजीचा सराव एकही दिवस थांबला नाही. घराच्या परिसरातील छोट्याशा जागेत ‘टार्गेट बॉक्स’ लावून व्हिडिओ कॉलिंगद्वारे तिने नवनवी कौशल्ये आत्मसात केली. भारताच्या मुख्य महिला तिरंदाजी संघाचा घटक बनलेली आदिती वयाने सर्वात लहान खेळाडू आहे. येत्या काळात तीन विश्वकरंडक स्पर्धा अन् एका विश्व अजिंक्यपद व आशियायी क्रीडा स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती सध्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकते.

सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी

या तिन्ही खेळाडू सामान्य कुटुंबातील आहेत. अनुष्काचे वडील दत्तात्रय कुंभार यांची वीटभट्टी आहे. आई स्वाती या घरकाम पाहतात. सुदेष्णाचे वडील हणमंत शिवणकर हे पोलिस सेवेत, तर आई प्रतिभा गृहिणी आहेत. आदितीचे वडील गोपीचंद स्वामी हे माध्यमिक शिक्षक आहेत. आई शैला या ग्रामसेविका आहेत. या तिन्ही कुटुंबांनी आपल्या मुलींवर प्रचंड विश्वास टाकला. त्यांच्यासाठी अखंड मेहनत घेतली. सतत प्रोत्साहन दिले.

प्रशिक्षकांचा मोलाचा हातभार

सुदेष्णा अन् अनुष्का या बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. या दोघींच्या कर्तृत्वाला पैलू पाडण्याचे काम खऱ्या अर्थाने श्री. बाबर यांनी केले आहे. आदितीसाठी प्रशिक्षक प्रवीण सावंत अन् सहायक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन फलदायी ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदितीचा खेळ दिवसेंदिवस बहरत गेला.

संघर्षाला ‘सकाळ’चे पाठबळ

या तिन्ही खेळाडूंच्या यशामागे संघर्षाची पार्श्वभूमी आहे. अनुष्काला सरावासाठी वर्णेतून रोज साताऱ्याला यावे लागते. वडील दत्तात्रय हे न थकता, न कंटाळता तिला ने-आण करण्याचे काम करतात. हणमंत शिवणकरही आपली धावपळीची नोकरी सांभाळून सुदेष्णाच्या सरावाची बारकाईने काळजी घेतात. आदिती ही अगदी बारीक चणीची खेळाडू. ती तिरंदाजीत कितपत यशस्वी ठरेल, ही कित्येकांना शंकाच होती. मात्र तिने मेहनतीने यश कवेत घेतले. या तिन्ही खेळाडूंना अगदी प्रारंभीपासूनच ‘सकाळ’चे पाठबळ लाभले. त्यांच्या जिद्दीचा प्रवास ‘सकाळ’ने सर्वदूर पोचविला.