सात्त्विक-चिरागचा झंझावात कायम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

सात्त्विक साईराज रांकीरेड्डी - चिराग शेट्टीचा थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील झंझावात कायम आहे. त्यांनी कोरियाच्या जोडीचे कडवे आव्हान परतवत उपांत्य फेरीत धडक मारली आणि भारताच्या या स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या.

मुंबई : सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी - चिराग शेट्टीचा थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील झंझावात कायम आहे. त्यांनी कोरियाच्या जोडीचे कडवे आव्हान परतवत उपांत्य फेरीत धडक मारली आणि भारताच्या या स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या.

बॅंकॉकला सुरू असलेल्या या स्पर्धेत बी. साई प्रणीत पुरुष एकेरीच्या तसेच अश्विनी पोनप्पा - सात्त्विक मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराजित झाले; पण सात्त्विक - चिरागने प्रगती केली. त्यांना जपान स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत हार पत्करावी लागली होती; पण थायंलड स्पर्धेत पुढचा पल्ला गाठला आहे.

सात्त्विक - चिरागने चोई सोल्गयू - सेओ सुएंग जेए यांचे आव्हान 21-17, 17-21, 21-19 असे एका तासात परतवले. सात्त्विक - चिरागचा खेळ दडपणाखाली जास्त उंचावतो, याची प्रचिती या लढतीत आली; पण त्यांना आपण दडपणाखाली गेलो, हे सलत असेल. पहिल्या गेमच्या मध्यास भारतीय जोडीने 13-7 आघाडी घेतली. कोरिया जोडीने प्रतिकार केला; पण भारतीय जोडीने किमान दोन गुणांचे वर्चस्व राखले आणि अखेर हा गेम चार गुणांच्या फरकाने जिंकला.

दुसऱ्या गेमच्या सुरुवातीस आघाडी सतत बदलत होती; पण 12-12 या स्थितीत भारतीय जोडीने सलग चार गुण गमावले; मग त्यांचा प्रतिकार कमीच पडत गेला. निर्णायक गेममध्ये 4-8 पिछाडीनंतर भारतीयांनी 9-9 बरोबरी साधली. त्यानंतर सतत आघाडी बदलत होती. भारतीय 18-19 मागे होते; पण त्यांनी सलग तीन गुण जिंकत चमकदार विजय मिळवला. आता त्यांच्यासमोर पुन्हा कोरियन जोडीचेच आव्हान असेल.

सात्त्विकच्या दुहेरीतील दुहेरी यशाच्या आशांना मात्र धक्का बसला. तो मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पासह सहभागी झाला आहे. सात्त्विक - अश्विनीला तिसऱ्या मानांकित युता वॅतांबे - ऍरिसा हिगाशिनो यांच्याविरुद्ध 13-21, 15-21 अशी हार पत्करावी लागली. पहिला गेम गमावल्यावर भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये 7-3 अशी आघाडी घेतली होती; पण त्याच वेळी त्यांनी सलग 12 गुण गमावले आणि प्रतिकाराच्या आशाच संपल्या.

बी. साई प्रणीत सातव्या मानांकित कांता सुनेयामाविरुद्ध 18-21, 12-21 असा पराजित झाला. प्रणीतने पहिल्या गेममध्ये 15-11 आघाडी घेतली, त्या वेळी धक्कादायक निकालाची आशा निर्माण झाली; पण कांताने अनुभव पणास लावला. त्यानंतरही प्रणीतने 18-17 आघाडी घेतली; मात्र सलग चार गुण गमावत त्याने गेम गमावला. दुसऱ्या गेममध्ये 9-10 ही निसटती पिछाडी सोडल्यास प्रणीतला फारसे काही साधले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satwik chirag enters semi final of thailand open badminton