esakal | सात्विकच्याच यशाचा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

सात्विकसाईराज
सात्विकसाईराज रांकिरेड्डी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी सुखद धक्का देत असताना साईना नेहवाल, किदांबी श्रीकांतने घोर निराशा केली. सात्विक - चिराग शेट्टीने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या जोडीस पराजित करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सात्विकच्याच यशाचा दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सात्विक साईराज रांकिरेड्डी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी सुखद धक्का देत असताना साईना नेहवाल, किदांबी श्रीकांतने घोर निराशा केली. सात्विक - चिराग शेट्टीने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या जोडीस पराजित करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

बॅंकॉकला सुरू असलेल्या या स्पर्धेत सात्विकने सलामीच्या दिवशी अश्‍विनी पोनप्पाच्या साथीत मिश्र दुहेरीत ऑलिंपिक उपविजेत्यांना हरवले होते; तर आता त्याने पुरुष दुहेरीत चमकदार विजय मिळवला. त्यांनी फाजर अल्फान - मुहम्मद रियान अर्दीआंतो या इंडोनेशियाच्या जोडीस 21-17, 21-19 असे पराजित केले. त्याची पुढील फेरीत लढत पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या जोडीविरुद्ध असल्यामुळे आव्हान तुलनेत सोपे आहे.

साईनाची धक्कादायक हार
साईना जपानची नवोदित खेळाडू सायाका ताकाहाशी हिला सहज पराजित करेल असा कयास होता. साईनाने दोघींतील यापूर्वीच्या चारही लढती जिंकल्या होत्या. तिने पहिला गेम जिंकत सुरुवातही चांगली केली, पण त्यानंतर पकड गमावली.

पहिल्या गेममध्ये सलग आठ गुण जिंकलेल्या साईनाला आघाडी राखण्यासाठी प्रयास पडले, त्यावेळीच आव्हान सोपे नसणार याची कल्पना आली. दुसऱ्या गेममध्ये साईनाने सुरुवातीसच सलग आठ गुण गमावले. 1-11 पिछाडीनंतर ती काहीच करू शकली नाही. निर्णायक गेममध्ये 12-9 आघाडीनंतर तिने दहा गुण गमावत पराभवासच निमंत्रण दिले. सदोष खेळामुळेच साईनावर ही वेळ आली.

पाचवा मानांकित किदांबी श्रीकांत आणि पारुपली कश्‍यप यांनाही गाशा गुंडाळावा लागला. श्रीकांत मानांकन नसलेल्या खोसित फेतप्रदाबविरुद्ध 21-11, 16-21, 12-21 असा पराजित झाला. तिसऱ्या मानांकित चोऊ तिएन चेनविरुद्ध कश्‍यपला 9-21, 14-21 पराभवास सामोरे जावे लागले.

loading image