esakal | INDvSA : ढगाळ हवामानातच होणार पुणे कसोटी!
sakal

बोलून बातमी शोधा

Du-Plesis-Virat

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर हा सामना होणार असून, गेले काही दिवस पुण्यात दिवसातून कधीही कोसळणारा पाऊसच खऱ्या अर्थाने या सामन्याचा 'ड्रायव्हर' असणार आहे.

INDvSA : ढगाळ हवामानातच होणार पुणे कसोटी!

sakal_logo
By
ज्ञानेश भुरे

पुणे : पहिल्या कसोटी सामन्यातील मोठा विजय, सलामीचा सुटलेला प्रश्‍न आणि जसप्रित बुमराच्या गैरहजेरीत महंमद शमीची भेदकता, तसेच आर. अश्‍विन, रवींद्र जडेजाची अचूकता यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून (ता.9) पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहणार यात शंकाच नाही. अर्थात, यानंतरही सामन्याचे भवितव्य मात्र हवामानावरच अवलंबून राहिल यातही शंका नाही. 

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर हा सामना होणार असून, गेले काही दिवस पुण्यात दिवसातून कधीही कोसळणारा पाऊसच खऱ्या अर्थाने या सामन्याचा 'ड्रायव्हर' असणार आहे. स्टेडियम परिसर हा पुण्यापासून दूर असला, तरी तेथेही अधून मधून पाऊस पडतच आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस प्रामुख्याने संध्याकाळच्या सत्रात पावसाची शक्‍यता वर्तवली असल्याने दिवसभराचा खेळ ढगाळ हवामानातच खेळला जाईल असेच वाटत आहे. 

सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी दक्षिण आफ्रिकेने सरावास येणे नाकारले, तर भारतीय संघाने सराव केला. सरावादरम्यानही पूर्ण वेळ आभाळ अंशतः ढगाळच होते. 

दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर झालेला सामना तीन दिवसात आटोपला होता आणि ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. नॅथन लियॉनच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजी गडबडली होती. त्या वेळी 'आयसीसी'कडून या मैदानाच्या खेळपट्टीला दर्जा मिळाला होता. या पार्श्‍वभूमीवर फॉर्मात असणाऱ्या भारतीय संघापुढे जशी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेची कसोटी लागणार आहे, तशीच काहिशी परीक्षा क्‍युरेटर पांडुरंग साळगांवकर यांची लागेल.

इतिहासाच्या या कटू आठवणी विसरल्या जाव्यात अशी खेळपट्टी करण्यासाठी साळगांवर यांनी जरुर प्रयत्न केले आहेत. पण, मधूनच कोसळणाऱ्या पावसाने खेळपट्टी बनविण्यात जरूर अडचणी आल्या. खेळपट्टी आज हिरवी दिसत असली, तरी आज दिवसभर खेळपट्टी झाकल्यानंतर उद्या सकाळी तिचा रंग नेमका कसा राहतो, यावर प्रतिस्पर्धी संघांचे नियोजन राहील. 

गेले काही दिवस दुपारनंतर पाऊस पडत असल्यामुळे दिवसाचे पहिले सत्र निर्णायक ठरेल. या कालावधीत हवामानही ढगाळ राहिल्यास वेगवान गोलंदाजांना साथ मिळेल यात शंका नाही. पण, दुपारनंतर मात्र ही खेळपट्टी फलंदाजांना साथ देऊ शकेल. संघात बदल करण्यास कर्णधार कोहली तयार नाही.

हवामान, खेळपट्टी आणि सामन्यातील परिस्थिती कशीही असली, तरी त्याचा सामना करण्याची क्षमता संघातील प्रत्येक खेळाडूंत असल्याचे त्याने सांगितले. हवामान, खेळपट्टी या खेळावर परिणाम करणाऱ्या गोष्टी असल्या तरी या अडचणींवर पाय देऊन पुढे जाणारे खेळाडू संघात असल्यामुळे अशा अडचणींचा फारसा विचार करत नाही, असे सांगून कोहलीने आम्ही तयार आहोत असे सांगितले. 

दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने आज सराव केला नसला, तरी त्यांना बुधवारी सराव करून मैदानाचा अंदाज घेतला आहे. पहिल्या डावात चांगला खेळ केल्यानंतर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू जणू आपल्या 'कच खाऊ' प्रवृत्तीला जागले आणि त्यांना मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. भारतीय मैदानावर त्यांच्या गोलंदाजांसमोर उभे रहायचे असेल, तर प्रतिस्पर्ध्याची मानसिकता खंबीर असणे आवश्‍यक आहे आणि दक्षिण आफ्रिकेला आता या आघाडीवरही विचार करावा लागणार आहे.

सलामीच्या कसोटीत पहिल्या डावात डीन, डी कॉकक, डु प्लेसी, मार्करम यांनी 'एल्गार' केला असला, तरी तो सातत्याने टिकवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहील. खेळपट्टी आणि हवमानाचे स्वरुप लक्षात घेता दक्षिण आफ्रिका पीएड्‌टला वगळून लुंगी एन्गीडी याला संधी देऊ शकते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- पुण्यातील सामन्यात साळगावकरांचीही 'कसोटी'

- धोनीची मुंबईत फुटबॉल प्रॅक्टीस

- स्मिथ, वॉर्नरचे टी-20 संघात 'कमबॅक'