भारतीय टीम दोन भागात विभागणार; चेतन शर्मांचे प्लॅनिंग? Selector May Divide Team India In Two Parts | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय टीम दोन भागात विभागणार; चेतन शर्मांचे प्लॅनिंग?

भारतीय टीम दोन भागात विभागणार; चेतन शर्मांचे प्लॅनिंग?

नवी दिल्ली : आयपीएलचा 15 वा हंगाम संपल्या संपल्या भारत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी 20 सामन्यांची मालिका (South India Africa Series T20 Series) खेळणार आहे. त्यानंतर जून महिन्यात लगेचच भारतीय संघ इंग्लंडमध्ये (England Tour) एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी देखील रवाना होणार आहे. या दोन पाठोपाठच्या मालिकांसाठी बीसीसीआयने एक खास प्लॅन केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चेतन शर्मांच्या (Chetan Sharma) अध्यक्षतेखालील निवडसमिती या दोन दौऱ्यासाठी दोन वेगवेगळे संघ तयार करणार आहेत. यापूर्वी असा प्रयोग इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यासाठी करण्यात आला होता.

इंग्लंड दौऱ्यासाठीचा संघ

दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मायदेशात होणारी 5 टी 20 सामन्यांची मालिका ही 9 जून ते 19 जून दरम्यान होणार आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, केएल राहुल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तरूण संघ खेळण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. यात काही अनुभवी खेळाडूंचा देखील समावेश करण्यात येणार आहे. यात शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांचा समावेश असेल या दोघांपैकी एकाच्या खांद्यावर संघाची धुरा असेल. यात तिलक वर्मा, उमरान मलिक (Umran Malik), अर्शदीप सिंग, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार आणि फिट झाला तर सूर्यकुमार यादव देखील या मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.