
ENG W vs IND W: ODI डेब्यू मॅचमध्ये शफालीनं रचला इतिहास
England Women vs India Women, 1st ODI: इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार हेदर नाईट हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून शफाली वर्माने भारतीय वनडे संघात पदार्पण केले. स्मृती मानधनाच्या साथीने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतकी भागीदारी करणाऱ्या शफालीला वनडे पदार्पणात धमाका करता आला नाही. उत्तुंग फटका मारण्याच्या नादात ती स्वस्तात बाद झाली. (shafali verma record becomes the youngest cricketer to represent india in all three formats)
तिच्यापाठोपाठ स्मृती मानधनाही लवकर बाद झाली. वनडेतील पदार्पणात शफालीला मोठी खेळी करण्यात अपयश आले असले तरी कर्णधार मिताली राजकडून वनडे कॅप घेताच तिच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीये.
सर्वात कमी वयात भारतीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात पदार्पण करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला. सध्याच्या घडीला शफाली वर्माचे (Shafali Verma) वय 17 वर्षे 150 दिवस इतकी आहे. सर्वात कमी वयात तिन्ही प्रकारात पदार्पण करणारी क्रिकेट जगतातील ती पाचवी खेळाडू ठरलीये.
भारत आणि इंग्लंड महिला संघातील पहिल्या वनडे सामन्यातील अपडेट्स
सर्वात कमी वयात तिन्ही प्रकारात पदार्पण करणारे खेळाडू
17 वर्षे 7 दिवस मुजीब-उर-रहमान (अफगाणिस्तान क्रिकेटर)
17 वर्षे 86 दिवस सारा टेलर (इंग्लंड महिला क्रिकेटर)
17 वर्षे 104 दिवस एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटर)
17 वर्षे 108 दिवस मोहम्मद आमिर (पाकिस्तान क्रिकेटर)
17 साल 150 दिन शफाली वर्मा (भारतीय महिला क्रिकेटर)
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या वनडे मालिकेत शफाली वर्माला संधी देण्यात आली नव्हती. इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून तिने कसोटीत दमदार पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात तिने 96 धावांची खेळी केली होती. स्मृती मानधनासोबत शतकी भागीदारीने तिने भारताच्या डावाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. या सामन्यात अवघ्या 4 धावांनी तिचे शतक हुकले. दुसऱ्या डावातही तिने अर्धशतक करत लक्षवेधी कामगिरी केली होती. वनडेतही तिचा हाच तोरा दिसेल असे वाटले होते. पण तिला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. उर्वरित तीन सामन्यात ती उणीव भरुन काढेल अशी आशा आहे. भारतीय महिला संघ इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळणार आहे.