World Cup 2019 : दृष्ट काढा रे या गोलंदाजीची !!

शैलेश नागवेकर
शुक्रवार, 28 जून 2019

हे भारतमाते, आपले क्रिकेटवीर गोलंदाज वर्ल्डकप मोहिमेत अशी काय दिमाखदार कामगिरी करत आहेत की वाटेत येणाऱ्या प्रत्येकाच्या वाईट नजरेतून दूर रहावेत यासाठी तूही आपल्या गोलंदाजांची अशीच दृष्ट काढ...

वर्ल्ड कप 2019 : आल्याची...गेल्याची...वाटेवरची कोणाचीही दृष्ट माझ्या लेकराला लागू नको असे म्हणत प्रत्येक माय आपल्या लेकराची मीठ मोहऱ्यांनी दृष्ठ काढत असते....

हे भारतमाते, आपले क्रिकेटवीर गोलंदाज वर्ल्डकप मोहिमेत अशी काय दिमाखदार कामगिरी करत आहेत की वाटेत येणाऱ्या प्रत्येकाच्या वाईट नजरेतून दूर रहावेत यासाठी तूही आपल्या गोलंदाजांची अशीच दृष्ट काढ...

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताने अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात खेळायचे तर 11 सामने खेळावे लागणार आहे (नऊ साखळी, एक उपांत्य आणि एक अंतिम) यातील सहा सामने झाले म्हणजे अर्धी स्पर्धा झाली. त्यामुळे सहामाही आढाव्यासारखे सहा सामन्यांचा आढावा घेतला तर विराटच्या टीम इंडियाची गाडी योग्य रुळावर आहे. वेगही चांगला पकडला आहे आता केवळ यात सातत्य हवे. या गाडीचा ड्रायव्हर अर्थात कर्णधार, सर्व धुरा व्यवस्थित सांभाळत आहे आणि त्याला सर्वात मोठी साथ मिळत आहे ती गोलंदाजांची !

मुळात गेली अनेक वर्षे फलंदाजी ही भारतीय संघाची प्रमुख ताकद राहिलेली आहे. गोलंदाजांचे यश हे बोनस ठरायचे, पण जेव्हा जेव्हा गोलंदाजांनी आघाडीवरची कामगिरी केली आहे तेव्हा तेव्हा अटके पार झेंडा रोवला गेला आहे. आठवतंय ना ? 1983 च्या विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामन्यात 183 धावा केवळ कपिलडेव्हिल्सच्या गोलंदाजांनी निर्णायक ठरवल्या होत्या.

त्या प्रमाणे आताही गोलंदाजी ही टीम इंडियाची नवी ओळख तयार झाली आहे. त्यांनी सहापैकी पाच सामने जिंकून अपराजित राहण्याची कामगिरी केली. त्यात गोलंदाजांचे योगदान फलंदाजांपेक्षा सर्वाधिक राहिले आहे. फलंदाजांनी अपेक्षेपेक्षा कमी धावा केलेल्या अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली आणि त्यामुळेच या मोहिमा फत्ते झाल्या.

सहा सामन्यात 45 विकेट

सहा सामन्यात मिळून आपल्या गोलंदाजांनी एकूण 45 विकेट मिळवल्या आहेत. यातील 29 विकेट वेगवान तर 14 विकेट फिरकी गोलंदाजांनी मिळवल्या असून दोन फलंदाज धावचीत केले आहे. ही कामगिरी भारताची गोलंदाजीतील ताकद सिद्ध करत आहे. जेव्हा राखीव खेळाडू येतो आणि स्थान बळकट करतो तेव्हा तुमची दुसरी फळीही किती मजबूत आहे हे स्पष्ट करत असते. हेच पाहाना. भुवनेश्वर कुमार जखमी होतो आणि त्याच्या ऐवजी संधी मिळालेला महंमद शमी दोन सामन्यांत सात विकेट मिळवतो. आता भुवनेश्वर तंदुरुस्त झाला तरी त्याला राखीव खेळाडूत रहावे लागेल. भारताने वेगवान गोलंदाजीत किती प्रगती केली आहे हे यातून सिद्ध होते.

आत्ताच्या घडीला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड यांचीही गोलंदाजी ताकदवर आहे. पण भारताची गोलंदाजी बाहुबली आहे. दिशा, टप्पा, वेगात कमी अधिकपणा, यॉर्कर आणि उसळता मारा ही आयुधे कधी आणि कशी वापरायची हे आता उमगले आहे. फार काही नको फक्त तंदुरुस्त रहा आणि सातत्य राखा कप आपलाच आहे. म्हणूनच म्हणावे लागते, दृष्ट लागू नये या गोलंदाजीला..

आता फलंदाजी सुधारा

महंमद शमी, जसप्रित बुमरा, हार्दिक पंड्या,  कुलदीप यादव, यझवेंद्र चहल हे प्रमुख पाच गोलंदाज साथीला केदार जाधव आहे त्यामुळे आता विजय शंकरला वगळून त्या ठिकाणी रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिक यांना संधी देऊन फलंदाजीची ताकद वाढवण्याची गरज आहे. अष्टपैलू हवाच असेल तर रवींद्र जडेजाला खेळवा पण चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवा... बस मग वर्ल्डकप आपल्यापासून दूर नसेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh Nagwekar Writes about Indian bowling attack