शांता रंगास्वामींचा राजीनामा, शास्त्रींचे पदही धोक्‍यात?

वृत्तसंस्था
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावर श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदावरून दूर करण्यात आले होते. आता तोच मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये पद भूषवणाऱ्या प्रत्येकाच्या मूळावर येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावल्यावर शांता रंगास्वामी यांनी राजीनामा दिला आहे. जर क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांकडून नियमाचा भंग होतो, तर त्यांनी निवड केलेले रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक पदावर कसे, अशी विचारणाही सुरू झाली आहे.

नवी दिल्ली / मुंबई : परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावर श्रीनिवासन यांना भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदावरून दूर करण्यात आले होते. आता तोच मुद्दा भारतीय क्रिकेटमध्ये पद भूषवणाऱ्या प्रत्येकाच्या मूळावर येत आहे. क्रिकेट सल्लागार समितीतील सर्व सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावल्यावर शांता रंगास्वामी यांनी राजीनामा दिला आहे. जर क्रिकेट सल्लागार समिती सदस्यांकडून नियमाचा भंग होतो, तर त्यांनी निवड केलेले रवी शास्त्री भारतीय क्रिकेट संघाच्या मार्गदर्शक पदावर कसे, अशी विचारणाही सुरू झाली आहे.

भारतीय क्रिकेट मंडळावरील नियुक्त लोकपाल न्यायाधीश (निवृत्त) डी. के. जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीतील कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांना नोटीस बजावली होती. रंगास्वामी या क्रिकेट सल्लागार समितीत आहेत, तसेच भारती क्रिकेटपटू संघटनेच्या संचालक आहेत, त्यामुळे परस्परविरोधी हितसंबंधी नियमाचा भंग होतो, असा दावा केला जात आहे.

लोढा समितीच्या शिफारशींच्या आधारे ही कारवाई होत असल्याचे सांगितले जात आहे. पण लोढा समितीनेच भारतीय क्रिकेट मंडळाच्या प्रशासनाची पुनर्रचना करताना भारतीय क्रिकेटपटू संघटनेची स्थापना करण्याचे सुचवले होते, याकडे रंगास्वामी लक्ष वेधतात.

क्रिकेटची सेवा करण्यासाठीच मी दोन्ही पदे स्वीकारली होती, पण मला निष्कारण वादात राहायचे नाही. क्रिकेटची सेवा करण्यातून वाद होत असेल, तर त्यापासून दूर होणेच चांगले, त्यामुळे मी दोनही पदांचा राजीनामा दिला आहे, असे रंगास्वामी यांनी सांगितले.
क्रिकेट सल्लागार समितीत सुरुवातीस सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश होता, पण त्यांच्याकडून परस्परविरोधी हितसंबंधाच्या नियमाचा भंग होतो, असा आरोप झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर प्रशासकीय समितीनेच कपिलदेव, गायकवाड आणि रंगास्वामी यांची समिती नेमली होती.

आश्‍चर्य म्हणजे तेंडुलकर, गांगुली आणि लक्ष्मण यांच्यावर परस्परविरोधी हितसंबंधांबाबत तक्रार केलेल्या संजीव गुप्ता यांनीच कपिलदेव, गायकवाड आणि रंगास्वामी यांच्याबद्दल तक्रार केली होती. गुप्ता हे मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे तहहयात सदस्य आहेत.

शास्त्रींच्या नियुक्तीबाबत वाद नसल्याचा दावा
रवी शास्त्रींच्या भारतीय संघाच्या मार्गदर्शकपदाच्या फेरनियुक्तीवरून कोणताही वाद होणार नसल्याचे प्रशासकीय समितीने सांगितल्याचे वृत्त आहे. "क्रिकेट सल्लागार समिती नियुक्ती होण्यापूर्वी आम्ही तीनही सदस्यांना परस्परविरोधी हितसंबंधांबद्दल माहिती देण्यास सांगितले होते. त्यावेळी आम्हाला काहीही आक्षेपार्ह आढळले नव्हते,' असे प्रशासकीय समितीचे सदस्य रवींद्र थोडगे यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. क्रिकेट सल्लागार समितीची केवळ प्रशिक्षक निवडीसाठीच नियुक्ती होती. शास्त्रींची नियुक्ती कायद्याला धरून आहे. त्यांच्याबरोबर करारही झाला आहे. त्यामुळे आता बदलाचा प्रश्‍नच नाही, असेही त्यांनी सांगितले. क्रिकेट सल्लागार समिती सुरुवातीस अस्थायी होती, पण त्यांनीच मार्गदर्शकपदास इच्छुक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या, तसेच वूर्केरी रामन यांची महिला संघाचे मार्गदर्शक म्हणून नियुक्तीही केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shanta rangaswami resigns, shastri may loose his job