World Cup 2019 : धवनच्या दुखापतीने समीकरण बदलणार 

dhawan ruled out because of injury. jpg
dhawan ruled out because of injury. jpg

नॉटिंगहॅम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुफानी शतकी खेळी केलेला डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीने जायबंदी झाला असून, सावरायला त्याला किमान तीन आठवड्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे रिषभ पंत याला बदली खेळाडू म्हणून इंग्लंडला दाखल होण्यास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नॅथन कुल्टर-नाईल याच्या अचानक उडालेल्या चेंडूने धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर आघात केला. मैदानावर थोडे उपचार घेऊन जिगरी धवनने खेळी पुढे चालू ठेवली. इतकेच नाही तर वेदना विसरून भन्नाट शतकही झळकावले. बाद होऊन तंबूत परतल्यावर मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो क्षेत्ररक्षणास आला नाही. 

संघ लंडनहून नॉटिंगहॅमला रवाना झाला असताना धवन फिजिओ पॅट्रिक फरहात यांच्यासह अंगठ्याचा स्कॅन टेस्टसाठी लीड्‌सला गेला. त्यात हेअरलाइन फ्रॅक्‍चरचे निदान झाले. ते बरे व्हायला संपूर्ण विश्रांती हा एकमेव उपाय असल्याने त्याला तीन आठवडे खेळापासून लांब राहावे लागणार आहे. 

धवनने आयसीसी स्पर्धांत मोठा ठसा उमटवला आहे. त्याची आणि रोहित शर्माची सलामी भारतीय संघाचे बळ वाढवत असताना ही दुखापत होणे दुर्दैवी आहे. आता पंतला त्वरित इंग्लंडच्या विमानात बसवायला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ धडपड करत आहे. 

"दुखापत होणे कोणाच्या हाती नसल्याने भारतीय संघ हा आघात स्वीकारून पुढच्या पर्यायी योजना आखणार आहे. धवनची अनुपस्थिती आम्हाला जाणवेल, पण संघात लोकेश राहुल असल्याने आम्हाला सलामीचा प्रश्न पडणार नाही. तसेच एक नवीन खेळाडूला संधी मिळेल ही जमेची बाजू आम्ही बघतो आहोत,' असे संघ व्यवस्थापनाने सांगितले. 

रिषभप्रमाणेच श्रेयसही स्पर्धेत 
सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्याने त्याच्याऐवजी रिषभ पंत याचा समावेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असली तरी त्याचबरोबर मुंबईचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरच्या नावाचीही चर्चा होत आहे. रोहितचा सलामीचा सहकारी म्हणून के. एल. राहुलला पसंती मिळण्याची शक्‍यता असली तरी संघाने बदली खेळाडू मागितल्यास श्रेयस अय्यरही स्पर्धेत असेल असे सांगितले जात आहे. आयपीएलमध्ये श्रेयसने मोक्‍याच्या वेळी धावा केल्या होत्या. पंत आणि अंबाती रायडू हे राखीव खेळाडू असले तरी संघव्यवस्थापन चौथ्या क्रमांकावरील स्पेशालिस्ट श्रेयस अय्यरसाठी आग्रह धरेल असे संकेत मिळत आहेत. अय्यर सध्या इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळत आहे ही जमेची बाब असेल, असेही मानले जात आहे. 

शिखर धवन संघासोबतच 
सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्‍चर निष्पन्न झाल्यामुळे त्याचा स्पर्धेतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतरही "बीसीसीआय'ने शिखरला इंग्लंडमध्येच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. तेथेच त्याच्यावर उपचार केले जातील. धवनच्या दुखापतीच्या बातमीनंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना बदली खेळाडू म्हणन पाठविण्याच्या चर्चेला वेग आला होता. मात्र, अजून तरी कुठल्याही बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com