Video : दानिश कनेरिया प्रकरणी शोएब अख्तरने घेतला यू-टर्न!

वृत्तसंस्था
रविवार, 29 डिसेंबर 2019

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याला दोषी ठरवत आजीवन बंदी घातली आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला संघातून वगळले.

कराची : हिंदू-मुस्लीम खेळाडूंच्या भेदभावावरून पाकिस्तान क्रिकेट विश्वात रान पेटले. दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे त्याच्यासोबत इतर पाकिस्तानी खेळाडू गैरवर्तन करत होते, असे वक्तव्य पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केले. या प्रकरणाने बराच वाद निर्माण झाल्यामुळे आता अख्तरने यू-टर्न घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत स्पष्टीकरण देताना अख्तरने म्हटले आहे की, ''माझ्या या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. दानिश कनेरिया हिंदू असल्याने तो काही लोकांना संघात नको होता. पण धर्मावरून खेळाडूंबाबत भेदभाव करण्याची पाकिस्तानची परंपरा नाही. संघातील काही खेळाडूंनी दानिशबरोबर गैरवर्तन केले, पण त्याला धर्म बदलण्यासाठी कधी सांगितलं नाही.''

''मी संघातील 1-2 खेळाडूंशी याबाबत बोललो होतो. अशा प्रकारची घटना प्रत्येक संघात होत असते. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी त्याला संघातून वगळण्यात आले, ना की तो हिंदू धर्माचा होता म्हणून,'' असेही अख्तरने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.  

दरम्यान, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद, पाकचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक आणि भारताचा सलामीवीर आणि भाजप खासदार यांनी कनेरिया प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. 

पाकिस्तानकडून खेळताना दानिशने 61 कसोटी सामन्यात 261 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याला दोषी ठरवत आजीवन बंदी घातली आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला संघातून वगळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shoaib Akhtar takes U turn in Danish Kaneria case and said my statement taken completely out of context