
Shoaib Akhtar : 'माझ्याकडे भारताचे आधार कार्ड आहे', शोएब अख्तरच्या वक्तव्याने उडाली खळबळ!
Shoaib Akhtar Statement on Asia Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या एका विधानाने खळबळ उडवून दिली आहे. अलीकडेच आशिया चषकाबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी भारताच्या पाकिस्तानात न येण्याच्या निर्णयाबाबत आयसीसीच्या पुढील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान पाकिस्तानच्या एका दिग्गज क्रिकेटपटूने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आशिया चषकाबाबत वक्तव्य केले आहे. आशिया कप खेळण्यासाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे, असे त्याने म्हटले. यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात व्हावा आणि भारत-पाक संघ अंतिम फेरीत भिडावेत, अशी माझी इच्छा आहे. एवढेच नाही तर त्याने भारतात खेळण्याबद्दलही बरेच काही सांगितले आहे.
शोएब अख्तर म्हणाला की, मी दिल्लीत येत राहतो. माझे आधार कार्ड बनले आहे, बाकी काही राहिले नाही. यंदाचा आशिया चषक केवळ पाकिस्तानमध्येच व्हावा आणि अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने यावेत, अशी माझी इच्छा आहे. मला भारतात खेळण्याची खूप आठवण येते. भारताने मला अपार प्रेम दिले आहे. आशिया कप पाकिस्तान किंवा श्रीलंकेत व्हावा.
आजकाल दोहामध्ये लिजेंड्स क्रिकेट लीग खेळली जात आहे. या लीगच्या चौथ्या सामन्यात इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स आमनेसामने होते. या सामन्यात शोएब अख्तरही गोलंदाजी करताना दिसला. मात्र त्याने फक्त 1 षटक टाकले. या षटकानंतर तो मैदानाबाहेर गेला. शोएबने गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पासमोर गोलंदाजी केली. या षटकात त्याने 12 धावाही लुटल्या.