esakal | World Cup 2019 :  होय! पंचांचा निर्णय चुकलाच 
sakal

बोलून बातमी शोधा

Simon taufel slams Kumar Dharmasena

. ओव्हर थ्रो आणि सर्वांत शेवटी सर्वाधिक चौकार मारण्यावरून विजेते ठरविण्याचा नियम, यामुळे "आयसीसी'ला चाहत्यांसह क्रिकेट पंडितांनीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. माजी ज्येष्ठ पंच सायमन टौफेल यांनी तर थेट पंचांवरच निशाणा साधला असून, "होय ! पंच ओव्हर थ्रोवरील धावा मोजताना चुकले,' असे थेट विधान केले आहे. 

World Cup 2019 :  होय! पंचांचा निर्णय चुकलाच 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी इंग्लंडचे नाव कोरले जाईलही. पण, त्यानंतरही ओव्हर थ्रोवर त्यांना मिळालेल्या सहा धावा योग्य होत्या की अयोग्य, हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ओव्हर थ्रो आणि सर्वांत शेवटी सर्वाधिक चौकार मारण्यावरून विजेते ठरविण्याचा नियम, यामुळे "आयसीसी'ला चाहत्यांसह क्रिकेट पंडितांनीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. माजी ज्येष्ठ पंच सायमन टौफेल यांनी तर थेट पंचांवरच निशाणा साधला असून, "होय ! पंच ओव्हर थ्रोवरील धावा मोजताना चुकले,' असे थेट विधान केले आहे. 

विश्‍वकरंडक स्पर्धेची सांगता चढउताराच्या अनेक पायऱ्यांनंतर एखाद्या थरारनाट्याला शोभावी अशी झाली. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या विजेतेपदाची नाही, तर पंचांचा दर्जा आणि आयसीसीचे नियम, याचीच चर्चा अधिक रंगली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सध्या क्रिकेटचे नियम बनविणाऱ्या एमसीसीच्या नियम उपसमितीचे सदस्य असणारे ज्येष्ठ माजी पंच सायमन टौफेल म्हणाले, ""ओव्हर थ्रोवर इंग्लंडला पाचऐवजी सहा धावा देण्याचा निर्णय घेताना पंचांकडून चूक झाली. त्या वेळी चेंडू फलंदाज बेन स्टोक्‍सच्या बॅटला लागून सीमापार गेला होता. त्या क्षणी इंग्लंडला फक्त पाच आणि पाचच धावा द्यायला हव्या होत्या.'' 

टौफेल क्रिकेट नियम 19.8 ला धरून म्हणाले, ""स्टोक्‍स आणि रशिद यांनी धाव पूर्ण झाली नाही, हे समजल्यावर बाजू बदलणे अपेक्षित होते. म्हणजे, दोन चेंडूंत पाच धावा, असे समीकरण असताना पाचवा चेंडू रशिदने खेळणे आवश्‍यक होते. तेदेखिल येथे घडले नाही.'' 

टौफेल यांनी या सगळ्या घटनेत पंचांची चूक झाली, असे मानले असले; तरी त्यांनी मैदानावरील पंचांची पाठराखण देखील केली आहे. ते म्हणाले, ""मैदानावर एकाच वेळी इतक्‍या गोष्टी त्या वेळी घडत होत्या, की ते गोंधळून गेले असावेत. थ्रो करते वेळी फलंदाजांनी पीच क्रॉस केले असावे, असा त्यांचा समज झाला असावा. हे सर्व आपल्याला टी. व्ही. रिप्लेमुळे कळून आले. पंचांची अडचण अशी झाली, की त्यांनी फलंदाजांनी पूर्ण केलेली धाव पाहिली आणि नंतर थ्रोकडे लक्ष दिले. ही पंचांची चूक झाली. पंचांनी नेमक्‍या घटनेला फलंदाज कोठे होते, हे पाहायला किंवा समजून घ्यायला हवे होते.''या निर्णयाचा सामन्यावर खूप प्रभाव पडला. या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची सवलत नाही. त्याची किंमत न्यूझीलंडला सामना गमावून मोजावी लागली. तरी यात इंग्लंड, न्यूझीलंड आणि अगदी पंच यांचा थेट सहभाग आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. 
- सायमन टौफेल, माजी क्रिकेट पंच 


क्रिकेटचा नियम 19.8 काय सांगतो?
क्रिकेटच्या नियमावलीत ओव्हर थ्रोच्या धावांसाठी 19.8 हा नियम आहे. तो "ओव्हर थ्रो किंवा विलफुल ऍक्‍ट ऑफ फिल्डर' या शीर्षकाने देण्यात आला आहे. "जर, ओव्हर थ्रोवर किंवा क्षेत्ररक्षकाच्या इच्छाशक्तीनुसार चुकीने चेंडू सीमापार झाला, तर जेवढ्या धावा पळून पूर्ण झाल्या असतील त्या आणि नंतर दंड म्हणून चार धावा देण्यात याव्यात. अर्थात, दंड धावा देताना पूर्ण झालेल्या धावा ग्राह्य धरण्यात याव्यात. यासाठी चेंडूंचा थ्रो झाला तेव्हाची दोन्ही फलंदाजांची स्थिती लक्षात घ्यावी,' असे हा नियम सांगतो. 

अंतिम सामन्यात काय घडले... 
बेन स्टोक्‍स आणि आदिल रशिद यांनी अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर धावण्यास सुरवात केली. न्यूझीलंड क्षेत्ररक्षक मार्टिन गुप्टिल याने थ्रो केला तेव्हा या दोघांपैकी कुणीही दुसऱ्या धावेसाठी पीच क्रॉस केलेले नव्हते. त्यामुळे येथे एकच धाव पूर्ण होते आणि इंग्लंडला सहा नव्हे, तर पाच धावा मिळतात.