पिछाडीनंतर सिंधूची सरशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश
मुंबई - रिओ ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अडथळा पार केला.

जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा कडवा प्रतिकार तसेच स्वतःच्या सदोष खेळावरही सिंधूला मात करावी लागली.

सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश
मुंबई - रिओ ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्या फेरीचा अडथळा पार केला.

जपानच्या नोझोमी ओकुहारा हिचा कडवा प्रतिकार तसेच स्वतःच्या सदोष खेळावरही सिंधूला मात करावी लागली.

इंडिया ओपन जिंकल्यानंतर जागतिक क्रमवारीत दुसरी असलेली सिंधू मलेशियन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराजित झाली होती. या वेळीही तिला पहिला गेम गमवावा लागला होता. त्यात सदोष खेळ तसेच खेळात नसलेले सातत्य तिला सलत होते. तिने अखेर जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याविरुद्ध 10-21, 21-15, 22-20 असा विजय मिळविला. ही लढत एक तास दोन मिनिटे चालली. दोघींमधील ही सहावी लढत होती, त्यापूर्वीच्या पाच लढतींत सिंधू 2-3 पिछाडीवर होती; पण ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूने जपानच्या प्रतिस्पर्धीस दोन गेममध्येच हरवले होते.

पहिल्या गेममध्ये सिंधूचे अनेक ड्रॉप्स तसेच स्मॅशेस नेटमध्ये जात होते, तसेच काही रॅलीजच्या वेळी तिचा शटलचा अंदाजही चुकला. ""पहिल्या गेममधील चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दुसऱ्या गेममध्ये जरा जास्त सतर्क होते. त्याचा नक्कीच फायदा झाला,'' असे सिंधूने सांगितले. तिने 6-6 बरोबरीनंतर सलग नऊ गुण जिंकत या गेमचा निर्णय स्पष्ट केला. तिसऱ्या गेममध्ये सिंधूने 16-8 आघाडी घेतली, त्या वेळी ती हा गेम सहज जिंकणार असेच वाटत होते; पण तिला 20-20 बरोबरीत सामोरे जावे लागले. ""ती चांगली लढवय्यी आहे. खेळातील चढ-उतारास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागते. मीच जिंकणार याची खात्री होती,'' असे सिंधूने सांगितले आणि तेच घडले.

आता सिंधूची लढत इंडोनेशियाच्या फित्रियानी हिच्याविरुद्ध होईल. दोघींमधील यापूर्वीची एकमेव लढत सिंधूने जिंकली आहे. जानेवारीतील सय्यद मोदी स्पर्धेतील ही लढत सिंधूने दोन गेममध्येच जिंकली होती.

सलामीची लढत जिंकल्याचा आनंद आहे. ओकुहारा चांगली प्रतिस्पर्धी आहे. पहिला गेम गमावल्यावर अधिक सतर्क झाले. ही लढत जिंकणार याचा विश्वास आला. आता दुसऱ्या फेरीच्या लढतीतील प्रतिस्पर्धी आव्हानात्मक आहे. त्यातही सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
- पी. व्ही. सिंधू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhu win after trailing