स्मिथने केली 'बाजीगर' कामगिरी; ठरला सहावा ऑस्ट्रेलियन खेळाडू

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 ऑगस्ट 2019

स्मिथच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा 4 बाद 242 धावा केल्या होत्या.

बर्मिंगहॅम : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाची बंदी आणि नंतर पुनरागमन केल्यावर सातत्याने उडविली जाणारी हुर्यो याकडे दुर्लक्ष करून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ याने सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावांतही शतक झळकाविण्याची कामगिरी केली. त्याने 148 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांसह कारकिर्दीमधील 25वे शतक झळकाविले. कारकिर्दीमधील 65व्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. इंग्लंडविरुद्ध त्याचे हे दहावे शतक ठरले. पहिल्या डावात त्याने 144 धावा केल्या होत्या. 

अ‍ॅशेस मालिकेत एकाच सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकाविणाऱ्या स्टिव्ह स्मिथ सहावा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याचवेळी इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेत सलग सहाव्या डावांत पन्नासहून किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सतरा वर्षांनी एखाद्या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी 2002 मध्ये मॅथ्यू हेडन याने ब्रिस्बेनमध्ये अशी कामगिरी केली होती. 

स्मिथच्या शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा 4 बाद 242 धावा केल्या होत्या. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा स्मिथ 98 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या सत्रात लगेचच त्याने आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडे तेव्हा 152 धावांची आघाडी होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smith becomes the sixth Australian player