Smriti Mandhana : स्मृतीची गाडी पॉवर प्लेच्या पुढे काही जात नाही; पेरीने अर्धशतक ठोकले तरी आरसीबी अडचणीतच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti Mandhana RCB

Smriti Mandhana : स्मृतीची गाडी पॉवर प्लेच्या पुढे काही जात नाही; पेरीने अर्धशतक ठोकले तरी आरसीबी अडचणीतच

Women's Primer League RCBW vs UPW : वुमन्स प्रीमियर लीगच्या आठव्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सर्वबाद 138 धावा केल्या. अनुभवी एलिस पेरीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर सोफी डिवाईनने देखील 36 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावली.

यूपीकडून सोफी एकलस्टोनने 4 तर दिप्ती शर्माने 3 विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. स्मृती मानधनाला तर पॉवर प्लेचे गणित काही सुटत नाहीये. ती चार पैकी तीन सामन्यात पॉवर प्लेमध्येच बाद झाली असून तिला चारहीवेळी फिरकीपटूंनी बाद केले.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजल बेंगलोरला सोफी डिवाईनने दमदार सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र या सुरूवातीला चौथ्या षटकात राजेश्वरी गायकवाडने ब्रेक लावला. राजेश्वरीने आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाला अवघ्या 4 धावांवर बाद केले. आरसीबीची पहिली विकेट 29 धावांवर पडली.

यानंतर आलेल्या एलिस पेरी आणि सोफी डिवाईन यांनी तडाखेबाज फलंदाजी करत आरसीबीला अर्धशतकी मजल मारून दिली. ही जोडी यूपीसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच एकलस्टोनने सोफीचा 36 धावांवर त्रिफळा उडवला.

सोफी बाद झाल्यानंतर पेरीने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र कनिका 8 धावांची तर हेथर नाईट 2 धावांची भर घालून माघारी परतली. पेरीने झुंजार खेली करत 13 व्या षटकात आरसीबीचे शतक धावफलकावर लावले. याचबरोबर एलिस पेरीने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.

पेरीने 39 चेंडूत 52 धावांची खेळी करत आरसीबीला 125 धावांपर्यंत पोहचवले. मात्र तिला दिप्ती शर्माने बाद करत आरसीबीला स्लॉग ओव्हरमध्ये मोठा झटका दिला. यानंतर यूपीने आरसीबीचा डाव 19.2 षटकात 138 धावात संपवला.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण