
स्मृतीची स्मरणीय खेळी; अखेर 5 पराभवानंतर टीम इंडिया जिंकली!
क्वीन्सटाऊन : भारतीय महिला क्रिकेट संघ (India Womens Cricket Team) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. येत्या 4 मार्चपासून महिलांचा वनडे वर्ल्डकप न्यूझीलंडमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे वर्ल्डकपची (ICC Womens World Cup 2022) तयारी म्हणून पाहिले गेले. मात्र एक टी 20 आणि 5 वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताला फक्त अखेरचा एकमेव वनडे सामना जिंकता आला. आज क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 6 विकेट्सनी पराभव केला. भारताकडून सलामीवीर स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) 71 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिला सामनावीराच्या पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा: पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची माळ गब्बरच्या गळ्यात नाही?
प्रथम फलंदजी करणाऱ्या न्यूझीलंडने 50 षटकात 9 बाद 251 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून (New Zealand Womens Cricket Team) अमेलिया केरने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा, स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडचे 251 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने 29 धावांवर शेफाली वर्माच्या रूपात आपली पहिली विकेट गमावली. त्यानंतर स्मृती मानधना आणि दिप्ती शर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दिप्ती शर्माने 21 धावांची खेळी करत स्मृतीची साथ सोडली.
हेही वाचा: VIDEO: आफ्रिदीला बोल्ड करणाऱ्या शाहनवाजचे सेलिब्रेशन पोहोचले पॅव्हेलियनपर्यंत
दिप्ती बाद झाल्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौरला (Harmanpreet Kaur) साथीला घेत स्मृतीने भारताला 150 चा टप्पा पार करून दिला. दरम्यान स्मृती मानधनाने आपले अर्धशतकही पूर्ण केले. ती आपल्या शतकाकडे कूच करत असतानाच अमेलिया केरने तिला 71 धावांवर बाद करत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला. मात्र हरमनप्रीत कौर आणि कर्णधार मिताली राज (Mithali Raj) यांनी भारताला यातून सावरत चौथ्या विकेटासाठी 72 धावांची भागीदारी रचत सामना आवाक्यात आणला. दरम्यान, 66 चेंडूत 63 धावांची खेळी करून आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर देणारी हरमनप्रीत बाद झाली. अखेर मिताली राज आणि रिचा घोष यांनी भारताच्या विजयाची औपचारिकता 46 व्या षटकात पूर्ण केली. मिताली राजने नाबाद 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.
Web Title: Smriti Mandhana Shine India Womens Cricket Team Won Final Odi Against New Zealand Womens Cricket Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..