World Cup 2019 : पाकला जीवदान; आफ्रिका आऊट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

यश अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या माजी विश्‍वविजडेत्या पाकिस्तानला रविवारी यंदाच्या स्पर्धेत जीवदान मिळाले. विजय आवश्‍यक असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला.

वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस : यश अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या माजी विश्‍वविजडेत्या पाकिस्तानला रविवारी यंदाच्या स्पर्धेत जीवदान मिळाले. विजय आवश्‍यक असलेल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 49 धावांनी पराभव केला. पाचव्या पराभवाने दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेतील उर्वरित सामने आता त्यांच्यासाठी केवळ औपचारिकतेचाच भाग राहतील. 

नाणेफेक जिंकण्यापासून आज पाकिस्तानसाठी सगळे हवे तसे घडत गेले. चांगल्या सुरवातीनंतर मधल्या फळीत बाबर आझम आणि हॅरिस सोहेलच्या अर्धशतकी खेळीने त्यांनी 50 षटकांत 7 बाद 308 धावा केल्या. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव 50 षटकांत 9 बाद 259 असा मर्यादित राखला. वहाब रियाझ आणि शादाब खान यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. 

षटकामागे सहा धावांचे आव्हान असलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरवात खराब होती. हाशिम आमलाचे अपयश कायम राहिले, पण क्विंटॉन डी कॉक आणि फाफ डू प्लेसी यांनी पाकची सुरवातीची आक्रमकता रोखली. त्यांनी पाऊणशतकी भागीदारी करताना षटकामागे पाचची धावगतीही राखली होती, पण शादाब खानच्या भेदकतेने पाकिस्तानला पुन्हा सामन्यात आणले. आफ्रिकेची अवस्था 1 बाद 91 वरुन 4 बाद 136 अशी झाली. डावाच्या मधल्या दहा षटकात त्यांनी 45 धावात चार विकेट गमावल्या होत्या. त्यातून सावरणे दक्षिण आफ्रिकेच्या पार आवाक्‍याबाहेरच होते. 

त्रिशतकी लक्ष्य होते, तरीही आघाडीच्या सहापैकी एकाच फलंदाजास जेमतेम अर्धशतक करता आले. उर्वरीत पाचपैकी तीन फलंदाजांना जम बसल्यावर अर्धशतकही करता आले नाही. फलंदाजीस अनुकुल खेळपट्टीवर ही चूक अर्थातच महागडी पडते, त्याचा अनुभव दक्षिण आफ्रिकेस आला. 
त्यापूर्वी, इमाम उल हक आणि फखर झमान यांनी पाकिस्तानच्या डावाला चांगली सुरवात करताना 81 धावांची सलामी दिली. मात्र, मोठी खेळी उभारण्यात त्यांना अपयश आले. इम्रान ताहिरच्या फिरकीने दोघांना चकवले. बाबर आझम-महंमद हफीज भागीदारी जमण्यापूर्वीच मोडली. फेहुलक्वायोने हफिजचा अडसर दूर केला. 

त्या वेळी एकत्र आलेल्या बाबर आणि शोएब मलिकच्या जागी संधी मिळालेल्या हॅरिस सोहेल यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना धावगती देखील वाढवली. या दोघांनी 68 चेंडूंत 81 धावांची भागीदारी केली. ाबर बाद झाल्यावर सोहेल आणि इमान वसिम यांनी 52 चेंडूत वेगवान 71 धावा जोडल्यामुळे पाकिस्तानचे त्रिशतकी आव्हान उभे राहिले. अखेरच्या तीन षटकांत फटकेबाजीच्या नादात सोहले, इमाद बाद झाल्यावर पाकिस्तानचे आव्हान मात्र, मर्यादित राहिले. 

संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान 50 षटकांत 7 बाद 308 (हॅरिस सोहेल 89 -59 चेंडू, 9 चौकार, 3 षटकार, बाबर आझम 69 -80चेंडू, 7 चौकार, इमाम उल हक 44, फखर झमान 44, इमाद वसिम 23, लुंगी एन्गिडी 9-0-64-3, इम्रान ताहिर 10-0-41-2) वि.वि. दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 9 बाद 259 (फाफ डू प्लेसी 63 -79 चेंडू, 5 चौकार, डी कॉक 47, व्हॅन डर डुस्सेन 36, डेव्हिड मिलर 31, अँडिल फेहलुक्वायो 46, वहाब रियाझ 10-0-46-3, शादाब खान 10-1-50-3, महंमद अमीर 10-1-49-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soth Africa out of World Cup 2019 as they lost against Pakistan