सौरभ वर्माच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात 

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

भारताच्या माजी विजेत्या सौरभ वर्माला गुरुवारी तैवान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील चोऊ तिएन चेन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. सौरभच्या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

तैवान ओपन बॅडमिंटन 
तैवान  - भारताच्या माजी विजेत्या सौरभ वर्माला गुरुवारी तैवान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील चोऊ तिएन चेन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. सौरभच्या पराभवाने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 

गेल्या महिन्यात हैदराबाद ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या सौरभला आज चोऊचा सामनाच करता आला नाही. स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेल्या चोऊने त्याचा 21-12, 21-10 असा अवघ्या 30 मिनिटांत पराभव केला. सौरभने 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. 

सौरभने यापूर्वी चोऊविरुद्धच्या दोन्ही लढती जिंकल्य होत्या. पण, या वेळी चोऊ अधिक सरस ठरला. चोऊन 5-0 अशी सुरवात करताना गेमच्या मध्यात 11-5 अशी मोठी आघाडी घेतली होती. सौरभने नंतर लढतीत परतण्याचा प्रयत्न केला. अधिक रॅलीज खेळण्यावर त्याचा भर होता. पण, चोऊने त्याला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या गेमला सौरभने 3-1 अशी आघाडी घेतली. पण, चोऊने भलताच वेगवान आणि आक्रमक खेळ करताना लढतीचे चित्र बदलले. डावाच्या मध्यापर्यंत सौरभला नंतर केवळ एकच गुण मिळवता आला, तर चोऊने 10 गुण मिळवत 11-4 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सौरभला त्याला गाठणे जमलेच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourabh Verma loses to Chou Tien Chen