
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिसने बुधवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इन्स्टाग्रामवरून त्यानं याबाबतची माहिती देताना म्हटलं की, माझं हृदय निर्मळ असून नवीन सुरुवात करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.
फाफ डुप्लेसीने एक वर्ष आधी कसोटी आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोडले होते. फाफने मर्यादित षटकांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा मोठा निर्णय़ घेतला. 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षामध्ये टी20 वर्ल्ड कप होणार आहे. आपल्यामध्ये अजुनही टी20 क्रिकेट असल्याचं डुप्लेसिसचं म्हणणं आहे.
निवृत्तीची घोषणा करताना त्याने म्हटलं की, आपल्या सर्वांसाठी हा काळ अडचणींचा सामना करत पुढे जाणारा राहिला. अनेकदा अनिश्चिततेचं वातावरण होतं. मात्र यामुळे काही बाबतीत माझं मत पक्कं झालं. निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात देशाचं प्रतिनिधीत्व करणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र आता कसोटीमधून निवृत्ती घेण्याची वेळ झाली आहे. पुढचे दोन वर्षे आयसीसी टी20 वर्ल्ड कप आहेत. त्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मी कसोटीतून निवृत्ती घेत आहे असंही फाफ डुप्लेसिने म्हटलं.
हे वाचा - क्रिकेटमध्ये रंगलाय हिंदू-मुस्लीम वाद; राहुल गांधींच्या ट्विटनंतर भाजप सरकारला जाग?
कसोटी, एकदिवसीय आणि टी20 मिळून फाफ डुप्लेसिसने दक्षिण आफ्रिकेकडून जवळपास 112 सामन्यात प्रतिनिधीत्व केलं. यापैकी 69 सामन्यात विजयांमध्ये डुप्लेसिची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 8 कसोटीपैकी 7 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
दक्षिण आफ्रिकेकडून 69 कसोटी खेळताना डुप्लेसिने 40 च्या सरासरीने 4 हजार 163 धावा केल्या होत्या. त्याच्या नावावर 10 शतके आणि 21 अर्धशतके आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 199 धावांची खेळी ही त्याची कसोटील सर्वोत्तम खेळी ठऱली.