World Cup 2019 : श्रीलंकेचेही आव्हान संपल्यातच जमा; आफ्रिकेचे वराती मागून घोडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 June 2019

आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी नाबाद 175 धावांची भागीदारी केली. 

वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : आव्हान अगोदरच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेचेही जहाज जवळपास बुडवले. श्रीलंकेला 203 धावांत रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने हे माफक आव्हान एका फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आफ्रिकेच्या फाफ डुप्लेसी आणि हाशिम आमला यांनी नाबाद 175 धावांची भागीदारी केली. 
इंग्लंडचा पराभव करून स्पर्धेत सनसनाटी निर्माण करणाऱ्या श्रीलंकेला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. बेजबाबदार फलंदाजी या अपयशास कारणीभूत ठरली. श्रीलंकेचे सात सामन्यातून सहाच गुण झाले आहेत. त्यांचे पुढचे दोन सामने वेस्ट इंडीज आणि भारताविरुद्ध शिल्लक आहेत दक्षिण आफ्रिकेचा हा आठ सामन्यातला दुसरा विजय आहे. 

प्रामुख्याने फलंदाजीत अपयशी ठरल्याचा दक्षिण आफ्रिकेला फटका बसला होता. आज मात्र डीकॉक लवकर बाद झाल्यावर आमला आणि डुप्लेसी यांनी श्रीलंका गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. डुप्लेसीचे शतक मात्र चार धावांनी अपुरे राहिले. आमला 80 धावांवर नाबाद राहिला. 

तत्पूर्वी, रबाडाने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार करुणारत्नेला बाद केले. पण नवोदित अविष्का फर्नांडो आणि कुशल परेरा यांनी प्रतिहल्ला करत सहा धावांच्या सरासरीने 66 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दक्षिण आफ्रिका गोलंदाजांची लय हरपल्याचे स्पष्ट जाणवत होते. श्रीलंका त्रिशतकी धावा उभारण्याचे चित्र निर्माण झाले होते. पण श्रीलंकेच्या फलंदाजांना 50 षटकांचा सामना असल्याचा विसर पडला आणि संयम राखताच आला नाही. हे दोघेही फलंदाज प्रत्येकी 30 धावांवर बाद झाले. 

3 बाद 72 अशा अवस्थेनंतर कोणी तरी डाव सावरण्याची गरज होती. अनुभवी आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज योग्य वेळी मैदानात आला. इंग्लंडविरुद्ध त्याची खेळी निर्णायक ठरली होती. आज मात्र त्याचा प्रतिकार तोकडा पडला. त्यानंतर एकेक फलंदाज हजेरी लावून आणि विकेट बहाल करून परतू लागला. तिसरा परेराने 21 धावांचे योगदान दिले आणि अखेरचा फलंदाज लसिथ मलिंगाने एक चौकार मारला तेव्हा कोठे श्रीलंकेचा द्विशतकी टप्पा गाठता आला. 

संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : 49.3 षटकांत सर्व बाद 203 (कुशल परेरा 30 -34 चेंडू, 4 चौकार, अविष्का फर्नांडो 30 -29 चेंडू, 4 चौकार, कुशल मेंडिस 23, तिसरा परेरा 21 -25 चेंडू, कागिसो रबाडा 10-2-36-2, ख्रिस मॉरिस 9.3-0-46-3, द्वेनी प्रिटोरिस 10-2-25-3, ड्युमिनी 2-0-15-1) वि. वि. दक्षिण आफ्रिका ः 37.2 षटकांत 1 बाद 206 ( हाशिम आमला नाबाद 80 -105 चेंडू, 5 चौकार, फाफ डुप्लेसी नाबाद 96 - 103 चेंडू, 10 चौकार, 1 षटकार, मलिंगा 10-1-47-1) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Africa wins against Srilanka in World Cup 2019