Irani Cup : सौराष्ट्राच्या तळाच्या फलंदाजांचा प्रतिकार; पुजारा दोन्ही डावांत अपयशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irani Cup

Irani Cup : सौराष्ट्राच्या तळाच्या फलंदाजांचा प्रतिकार; पुजारा दोन्ही डावांत अपयशी

Irani Cup : शेल्डन जॅकसन (७१ धावा), अर्पित वसावडा (५५ धावा), प्रेरक मंकड (७२ धावा) व जयदेव उनाडकट (नाबाद ७८ धावा) या अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या व नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी अर्धशतकी खेळी केल्यानंतरही सौराष्ट्राचा संघ संकटातून बाहेर आलेला नाही. सौराष्ट्राच्या संघाने दुसऱ्या डावात ८ बाद ३६८ धावा केल्या असून आता त्यांचा संघ फक्त ९२ धावांनी पुढे आहे. इराणी करंडकाच्या लढतीचे दोन दिवस अद्याप बाकी असून शेष भारताने विजयाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

हेही वाचा: National Sports Competition : महिलांना रौप्य, तर पुरुषांना ब्राँझ

सौराष्ट्राच्या संघाने २ बाद ४९ या धावसंख्येवरून सकाळच्या सत्रात पुढे खेळायला सुरुवात केली. पण चिराग जानी (६ धावा), धमेंद्रसिंग जडेजा (२५ धावा) यांना अपयशाचा सामना करावा लागला.कसोटीपटू चेतेश्‍वर पुजाराकडून याही डावात निराशा झाली. पहिल्या डावात अवघी १ धावा काढून बाद झालेला पुजारा दुसऱ्या डावातही एक धावेवरच बाद झाला. कुलदीप सेन यानेच दोन्ही डावांत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हेही वाचा: Sports Update : मनमाडच्या शिरपेचात अजून मानाचा तुरा

त्यानंतर जॅकसन, वसावडा, मंकड व उनाडकट या चौघांनी सौराष्ट्राचा संघ डावाने पराभूत होणार नाही याची काळजी घेतली. चौघांच्या दमदार अर्धशतकांमुळे सौराष्ट्राचा सोमवारी ८ बाद ३६८ धावा फटकावता आल्या. आता उनाडकट ७८ धावांवर खेळत असून या खेळीत त्याने ८ चौकार व २ षटकार मारले आहेत. त्याच्यासोबत पार्थ भूत ६ धावांवर खेळत आहे. चेतन सकारीया अखेरचा फलंदाज असणार आहे. शेष भारताकडून कुलदीप सेन व सौरभकुमार यांनी प्रत्येकी ३ फलंदाज बाद केले.

हेही वाचा: Sports News : हार्दिक पांड्याच्या दुखापतीचे रहस्य कायम

संक्षिप्त धावफलक : सौराष्ट्र- पहिला डाव सर्व बाद ९८ धावा आणि दुसरा डाव ८ बाद ३६८ धावा (शेल्डन जॅकसन ७१, अर्पित वसावडा ५५, प्रेरक मंकड ७२, जयदेव उनाडकट नाबाद ७८, कुलदीप सेन ३/८५, सौरभकुमार ३/८०) वि. शेष भारत - पहिला डाव सर्व बाद ३७४ धावा