क्रीडाक्षेत्रात भारताचे पुढचे पाऊल

पॅरिस ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त भारतीय खेळाडू पात्र ठरावेत, त्याची चांगली तयारी व्हावी याची निश्चिती करण्यात प्रयत्नांमध्ये सरकारने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.
anuragsinh thakur
anuragsinh thakursakal

पॅरिस ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त भारतीय खेळाडू पात्र ठरावेत, त्याची चांगली तयारी व्हावी याची निश्चिती करण्यात प्रयत्नांमध्ये सरकारने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही, असे नमूद करताना युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी भारत क्रीडाक्षेत्रात वेगाने प्रगती करीत असल्याचे सांगितले. यासंदर्भात त्यांची मुलाखत.

प्रश्न - केंद्र सरकारने २०३६च्या ऑलिम्पिकसाठी भारत आयोजनास इच्छुक असल्याचे जाहीर केले होते. ऑलिम्पिकच्या आयोजनाबद्दल ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’ सोबतची बोलणी कुठवर आली आहेत?

अनुराग ठाकूर - ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची ऐतिहासिक परिषद झाली. या परिषदेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी उत्सुक असल्याचे आणि त्यादृष्टीनेच २०३६ ला होणाऱ्या मुख्य आणि २०३० ला होणाऱ्या ‘युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ भारतात आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. आपण `भारतीय ऑलिम्पिक संघटने’शी समन्वय साधून काम करत आहोत आणि त्याचवेळी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’च्या संभाव्य आयोजक आयोगासोबतही चर्चा करत आहोत. संभाव्य आयोजक आयोगासोबत याआधीच चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत, आणि त्या फलदायीही ठरल्या आहेत.

अशा प्रकारच्या स्पर्धा तसेच इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे देशात आयोजित केल्यामुळे नेमका कशा प्रकारचा लाभ वा फायदा होतो?

- ही वेळ देशाने जागतिक क्रीडा पटलावर पुढचे पाऊल टाकण्याची वेळ आहे. विविधांगी क्रीडाप्रकारांचा समावेश असलेल्या क्रीडास्पर्धांचे यजमानपद भूषवल्याने भारताच्या प्रतिमेत सुधारणा होऊ शकते.

आपण ‘फिफा’च्या १७ वर्षांखालच्या पुरुष आणि महिला विश्वचषक स्पर्धेचे , ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या पुरुष हॉकी विश्वचषक यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजनही केले. एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याने आपल्या देशातील खेळाडूंना - मग ते वरिष्ठ गटातले असोत की कनिष्ठ गटातले, आपल्या घरच्या मैदानात सर्वोच्च स्तरावरील क्रीडास्पर्धा पाहण्याची संधी मिळते आणि त्याचवेळी मायदेशातील माहिती असलेल्या वातावरणात अशा मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचीही संधी मिळते.

देशातील एकंदर क्रीडा परिसंस्था मजबूत व्हायला त्यामुळे मदत होते. यजमानपदे भूषवणारी शहरे आणि तिथल्या नागरिकांनाही आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळण्याची प्रेरणाही या स्पर्धांमुळे मिळत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संकल्प समोर ठेवला आहे तो म्हणजे २०३६ पर्यंत भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र म्हणून उदयाला येईल आणि येत्या काही वर्षांतच भारतीय क्रीडा अर्थव्यवस्थेचे मूल्य एक लाख कोटी रुपयांचे होईल. या सगळ्याचे प्राथमिक लाभार्थी हे देशातील तरुणच असणार आहेत.

युवा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याचा भारताचा मानस पाहता, पदकांच्या बाबतीतही मोठे यश मिळविण्याचाही भारताचा प्रयत्न असेलच. त्यादृष्टीने पाहिले तर कशा प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे? जास्तीत जास्त पदके मिळवून देऊ शकतील अशा कोणत्या क्रीडाप्रकारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत?

- आपलं क्रीडा मंत्रालय आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी अशा तऱ्हेचे क्रीडा प्रकार आणि खेळ निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू याआधीच सुरु केली आहे, की ज्यांमध्ये आपल्याला पदकविजेती कामगिरी करणे शक्य आहे.

आपली कामगिरी आधीपेक्षाही चांगली असावी यासाठी, आपण जागतिक पटलावर याआधीच ज्या क्रीडाप्रकरांमध्ये यश मिळवलं आहे, त्यापलिकडे जात हा शोध सुरु आहे. आपण आत्तापासूनच सायकलिंग आणि पोहण्यासारख्या खेळांना प्रोत्साहन देऊ लागलो आहोत, कारण या खेळांमध्ये आपली कामगिरी उंचावण्याची आणि आपल्याला पदके जिंकून देत पदकतालिकेतील स्थान उंचावण्याची क्षमता आहे. सरकारने गेल्या दशकात क्रीडा मंत्रालयासाठीच्या अर्थसंकल्पी तरतुदीची व्याप्ती २०१३-१४ मधील १,०९३ कोटी रुपयांवरून २०२३-२४ मध्ये ३३९७.३२ कोटी रुपयांपर्यंत, म्हणजेच तीन पटींनी वाढवली आहे.

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातूनही क्रीडा क्षेत्रात खासगी गुंतवणूक होऊ लागली आहे. या गुंतवणुकीमुळे क्रीडा क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लावला आहे. खरं तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत आपण पहिल्या दहामध्ये स्थान मिळवावं अशीच आमची इच्छा आहे, हे लक्ष्य नक्कीच साध्य करू शकू.

खरे तर ‘खेलो इंडिया’ या उपक्रमात सरकारने बरीच गुंतवणूक केल्याचे दिसतेच. या उपक्रमाचा अपेक्षित परिणाम दिसून आला आहे, असे म्हणता येईल का?

- अर्थातच! खेलो इंडिया उपक्रमाचे अपेक्षित परिणाम निश्चितच दिसून आले आहेत. हा काही केवळ एक उपक्रम किंवा योजना नाही, तर ही एकप्रकारची देशव्यापी चळवळच बनली आहे. ‘खेलो इंडिया’चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे, प्रशिक्षणासाठीच्या एका सुनियोनिजित व्यवस्थेअंतर्गत खेळाडूंमधील प्रतिभा हेरणे आणि ती विकसित करणे.

याअंतर्गत आपण सद्यःस्थितीत २८०० पेक्षा जास्त खेळाडूंना प्रशिक्षण, आवास - निवास, तसेच त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठीचे आर्थिक सहकार्य अशा प्रकारची मदत आणि सहकार्य पुरवत आहोत, आणि त्यासाठी वार्षिक ६.२८ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देत आहोत. दरवर्षी या योजनेत नवीन खेळाडूंचा समावेश केला जातो, त्यांच्या कामगिरीवर सातत्यपूर्ण देखरेख ठेवली जाते. या सगळ्या माध्यमातून जे योग्य आहेत त्यांना ठेवणे आणि जे योग्य नाहीत त्यांना बदलणे अशी नियमित प्रक्रियाही सुरुच असते.

महाराष्ट्रासाठीची एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. ती म्हणजे, ‘खेलो इंडिया’ योजने अंतर्गत एकूण ११०.८२ कोटी रुपये खर्चाच्या १३ पायाभूत सुविधा योजना महाराष्ट्रासाठी मंजूर झाल्या आहेत. राज्यात खेलो इंडिया योजने अंतर्गत ४१ अकादमी देखील अधिस्वीकृत आहेत. राज्यात ३४७ खेलो इंडिया खेळाडू आहेत. ३४ खेलो इंडिया केंद्रे आणि एक ‘खेलो इंडिया उत्कृष्टता केंद्र’ राज्यात स्थापण्यात आले.

क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधांच्या विकासावर अलीकडच्या वर्षांत झालेल्या कामावर काहीएक प्रकाश टाकू शकाल का?

- पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ हे दोन घटक म्हणजे कोणत्याही क्रीडा परिसंस्थेचा कणाच आहेत. अशा सुविधांमुळे देशाच्या सर्वोत्तम प्रतिभावान खेळाडूंना कायमच देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी कामगिरी करण्यासाठीचे प्रोत्साहन मिळत असते. हे सगळं समजून घेतलं तर तळागाळातील खेळाडूंच्या दारात आधुनिक क्रीडा सोयीसुविधा पोहोचविण्याची सर्वाधिक गरज असल्याचे लक्षात येईल.

कारण असं घडू शकलं तर त्यामुळे या खेळाडूंची जडणघडण त्यांना घरापासून दूरवर नेऊन नाही, तर त्यांच्या घरांच्या आसपासच करणे शक्य होईल. नेमक्या याच विचारांतून सरकारने २०१६ पासून तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३३१ प्रकल्प मंजूर केले आहेत.

आता काही काळातच म्हणजेच ऑगस्ट २०२४ मध्ये पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी कशी सुरु आहे, त्याबद्दल काय माहिती देऊ शकाल? यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आपण किती पदकांची अपेक्षा करू शकतो असं वाटतंय ?

- बघा, आपले खेळाडू २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र व्हावेत आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेसाठीही त्यांना चांगली तयारी करता यावी, यासाठी आपल्या सरकारने त्यांना अगदी मनापासून पाठबळ आणि सहकार्य दिले आहे. खरे तर आपण किती पदके जिंकू याबद्दल माझ्या किंवा इतरांच्या मनात विशिष्ट आकडा नाही; पण तरीदेखील मला खात्री आहे की पॅरिसमध्ये खेळाडू ऑलिम्पिक खेळांमधली आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवूनच मायदेशी परततील. खेळाडू कोणत्याही दडपणाशिवाय खेळत आहेत, आणि ते जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी बरोबरीने स्पर्धा करत आहेत.

२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त भारतीय खेळाडू पात्र ठरावेत, त्याची चांगली तयारी व्हावी याची निश्चिती करण्यात आम्ही प्रयत्नांत कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. या हंगामात आम्ही ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या निवडक क्रीडाप्रकारांसाठीचे प्रशिक्षण, या क्रीडाप्रकारांशी संबंधित स्पर्धांसाठी ३५० पेक्षा जास्त परदेशी दौऱ्यांना मान्यता दिली. सरकारच्या सहकार्यामुळे खेळाडूंनाही सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. आत्तापर्यंत आपले ५८ खेळाडू २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com