क्रीडामंत्री रिजीजू भारताच्या ऑलिंपिक कामगिरीवर नाराज 

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जुलै 2019

केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी दिर्घ मुदतीचे नियोजन आणि तशी तयारी आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी गेल्या ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीयांच्या कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचे सांगितले. ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी दिर्घ मुदतीचे नियोजन आणि तशी तयारी आवश्‍यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भारतीय खेळाडूंमद्ये इतकी गुणवत्ता आहे की, गेल्या स्पर्धेत मिळवली त्यापेक्षा अधिक पदके ते मिळवू शकतात. पण, परिपूर्ण तयारीचा अभाव असल्याने आपण मिळालेल्या यशावर समाधानी राहतो,असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,""ऑलिंपिकमध्ये पदके वाढली इतक्‍यावर समाधान मानण्यापेक्षा आपल्याकडे आहे त्या गुणवत्तेला परिपूर्णतेची जोड द्या. आपल्याकडे तेवढी ताकद आणि क्षमता आहे. आपले खेळाडू कठोर मेहनत घेतात आणि त्यातील काहीच खेळाडू पदके मिळवितात. हे बरोबर नाही. मेहनत करणाऱ्या प्रत्येकाने पदकापर्यंत पोचायला हवे.'' 

रिजीजू यांनी रविवारी कांदिवली येथील स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई) केंद्रास भेट दिली. त्या वेळी त्यांनी सराव करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांशी देखील संवाद साधला. टोकियो ऑलिंपिकसाठी आत खूप कमी वेळ राहिला आहे. यात मी काही बदल करणार नाही. पण, भविष्यात ऑलिंपिकमध्ये अधिक यश मिळविण्याची खूणगाठ आतापासूनच बांधा, असा सल्ला खेळाडूंना दिला. कोट्यवधी लोकसंख्येच्या मानाने आपले आशियाई आणि ऑलिंपिकमधील यश खूपच कमी आहे, याचा पुनरुच्चार करताना रिजीजू यांनी यासाठी सर्वप्रथम देशात क्रीडा संस्कृती रुजण्याची गरज असल्याचे सांगितले. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतींविषयी बोलण्यास नकार दिला. जेव्हा द्विपक्षीय मालिका किंवा स्पर्धा सहभागाचा प्रश्‍न येतो, तेव्हा तो परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत येतो. त्यांचे आदेश अखेरचा.'' 

रिजीजू म्हणाले 
-हॉकीमधील मक्तेदारी संपुष्टात आली. 
-राष्ट्रीय खेळात 1980नंतर पदक नाही. यात सुधारणा हवी 
-पॅरिस 2024, लॉस एंजेलिस 2028 स्पर्धांचे उद्दिष्ट आतापासूनच ठेवला 
-नियोजन, खेळाडू घडविण्याची प्रक्रिया, शास्त्रीय दृष्टिकोन अशा सर्व आघाड्यांवर विचार करण्याची गरज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports minister rojiju is not happy with indias performance in Olympic