मेरीच्या थेट निवडीबद्दल क्रीडा मंत्रालयाची नोटीस

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोणतीही चाचणी न करता मेरी कोमची जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या 51 किलो गटासाठी भारतीय संघात निवड केल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय बॉक्‍सिंग महासंघास नोटीस दिल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : कोणतीही चाचणी न करता मेरी कोमची जागतिक बॉक्‍सिंग स्पर्धेच्या 51 किलो गटासाठी भारतीय संघात निवड केल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय बॉक्‍सिंग महासंघास नोटीस दिल्याचे वृत्त आहे.

भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने जागतिक स्पर्धेच्या संघनिवडीसाठी चाचणी घेतली होती; पण त्यातील 51किलो गटाची चाचणी न घेताच मेरीला संघात स्थान देण्यात आले. हाच निर्णय 69 किलो गटासाठीही झाला होता. 51 किलो गटातील स्पर्धक निखत झरीन चाचणीतील वनलाल दुआती हिच्याविरुद्धच्या लढतीसाठी तयार होत असताना या गटाची चाचणी रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. निखतने या संदर्भात बॉक्‍सिंग महासंघाकडे तक्रार केली आहे.

केंद्रीय क्रीडा खात्याने 2011 मध्ये क्रीडासंहिता तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी निवड चाचणी बंधनकारक आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिज्जू या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच क्रीडा मंत्रालयाने भारतीय बॉक्‍सिंग महासंघास सर्व गटांसाठी निवड चाचणी न घेतल्याबद्दल नोटीस दिली आहे.

निखत झरीनने आशियाई बॉक्‍सिंगमध्ये 51 किलो गटात पदक जिंकले आहे; तसेच नुकत्याच झालेल्या थायलंड स्पर्धेत ती उपविजेती होती. मेरीची थेट निवड करण्याचा निर्णय भारतीय बॉक्‍सिंग पदाधिकाऱ्यांबरोबरील चर्चेनंतर झाल्याचे सांगितले जात आहे. जागतिक स्पर्धा 3 ते 13 ऑक्‍टोबर दरम्यान आहे.

पुरस्कार निवड समिती समावेशावरूनही वाद
मेरी कोमची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीत निवड झाल्यानेही वाद सुरू झाला आहे. मेरी कोम अजूनही खेळत आहे, मग तिचा समितीत कसा समावेश होतो, अशी विचारणा क्रीडा खात्यातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कली आहे. मेरी खेळत असताना आपल्या प्रतिस्पर्धीची अर्जुन पुरस्कारासाठी किंवा प्रतिस्पर्धींच्या मार्गदर्शकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कशी शिफारस करू शकेल, अशी विचारणा केली जात आहे. काही क्रीडा महासंघाचे वरिष्ठ पदाधिकारी ही निवड परस्परविरोधी हितसंबंधांच्या नियमाचा भंग करणारी नाही का, अशीही विचारणा करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports ministry give notice regarding mary kom selection procedure