esakal | नदालला श्‍वार्टझमनने झुंजवले
sakal

बोलून बातमी शोधा

मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमनचा पराभव केल्यानंतर स्पेनच्या रॅफेल नदालने अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

नदालला श्‍वार्टझमनने झुंजवले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेलबर्न - स्पेनच्या रॅफेल नदालने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असला, तरी त्याची वाटचाल पुन्हा एकदा संघर्षपूर्ण ठरली. त्याला अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याने तब्बल चार तास झुंजवले.

नदालने चार सेटपर्यंत रंगलेल्या लढती त्याच्यावर ६-३, ६-७(४-७), ६-३, ६-३ असा विजय मिळविला. नदालने दहाव्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याची गाठ आता क्रोएशियाच्या मरिन चिलीचशी पडेल. नदालपाठोपाठ अशाच एका संघर्षपूर्ण लढतीत बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रावने ऑस्ट्रेलियाचा ‘बॅड बॉय’ निक किर्गिओसचे आव्हान संपुष्टात आणले. दिमित्रावने ३ तास २६ मिनिटे चाललेल्या लढतीत किर्गिओसचे आव्हान ७-६(७-३), ७-६ (७-४), ४-६, ७-६(७-४) असे संपुष्टात आणले. 

महिला विभागात द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकी हिने तासाभरात स्लोव्हाकियाच्या मॅग्डेलेना रिबरीकोवा हिचे आव्हान ६-३, ६-० असे संपुष्टात आणले. डेन्मार्कच्या वॉझ्नियाकीने दुसऱ्या सेटमध्ये केवळ सहा गुण गमावले. स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिने ॲनट कोंटाव्हेईटचा ४-६, ६-४, ८-६ असा पराभव केला.

पेस-राजा पराभूत
अनुभवी लिअँडर पेस आणि पुरवा राजा या भारतीय जोडीचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. उप-उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत कोलंबियन ज्युआन सेबॅस्टियन कॅबल-रॉबर्ट फराह जोडीने त्यांचे आव्हान ६-१, ६-२ असा पराभव केला. 

निकाल (एकेरी) पुरुष - काईल एडमंड वि.वि. आंद्रेआस सेप्पी ६-७(४-७), ७-५, ६-२, ६-३, मरिन चिलीच वि.वि. पाब्लो कॅरेनो बुस्टा ६-७(२-७), ६-३, ७-६(७-०), ७-६(७-३) महिला ः एलिसे मेर्टेन्स वि.वि. पेट्रो मार्टिच ७-६(७-५), ७-५. एलिना स्विटोलीना वि.वि. डेनिसा अलर्टोव्हा ६-३, ६-०.

बोपण्णाची आगेकूच
भारताच्या रोहन बोपण्णाने हंगेरीच्या तिमेआ बाबोस हिच्या साथीत मिश्र दुहेरीत आपली आगेकूच कायम राखली. बोपण्णा-बाबोस जोडीने ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित व्हिटिंगटॉन-पेरेझ जोडीचा ६-२, ६-४ असा पराभव केला. तासाभरापेक्षा कमी वेळेत त्यांनी विजय मिळविला. बोपण्णा-बाबोस जोडीला पाचवे मानांकन आहे.

loading image