सरदार सिंगला अपेक्षेनुसार डच्चू

पीटीआय
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताच्या नवोदित संघास प्रेरीत करण्यात अपयशी ठरल्याने सरदार सिंग तसेच रमणदीप सिंगला भारतीय हॉकी संघातून वगळण्यात आले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात सरदारला स्थान नसल्याने त्याची कारकीर्द संपलीच असल्याचे मानले जात आहे. 

मुंबई - सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताच्या नवोदित संघास प्रेरीत करण्यात अपयशी ठरल्याने सरदार सिंग तसेच रमणदीप सिंगला भारतीय हॉकी संघातून वगळण्यात आले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात सरदारला स्थान नसल्याने त्याची कारकीर्द संपलीच असल्याचे मानले जात आहे. 

३१ वर्षीय सरदारसाठी अझलन शाह स्पर्धा चाचणी होती. त्यात तो अपयशी ठरला. या स्पर्धेत मोक्‍याच्या वेळी भारतीय मधल्या फळीची सूत्रे सांभाळण्यास तो अपयशी ठरला. त्याचबरोबर त्याचा फिटनेसही पूर्वीसारखा राहिलेला नाही. वेगवान हॉकीशी जुळवून घेण्यात तो कमी पडतो, असे मार्गदर्शकांचे मत झाल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. मलेशियात आक्रमणाची जबाबदारी रमणदीपवर होती; पण भारतास मोक्‍याच्या सामन्यात गोल करण्यात अपयश आले. नवोदित आक्रमकांना संधीचा फायदा घेता आला नाही, त्यामुळे रमणदीपला वगळण्यात आले आहे. 

जागतिक हॉकी लीग तसेच आशिया स्पर्धेत भारताचे नेतृत्त्व केलेला मनप्रीत सिंगच या स्पर्धेत नेतृत्त्व करणार आहे. त्याचबरोबर चिंगलसेना सिंगकडेही पुन्हा उपकर्णधारपद सोपवण्यात आले. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश तसेच आक्रमक एसव्ही सुनील यांनी संघात पुनरागमन केले आहे. मलेशिया स्पर्धेत चांगली कामगिरी केलेला गोलरक्षक सूरज करकेरा याने संघातील स्थान राखले आहे. 

भारतीय संघ - गोलरक्षक ः आर. श्रीजेश, सूरज करकेरा. बचावपटू ः रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, कोथाजित सिंग, गुरिंदर सिंग, अमित रोहिदास. मध्यरक्षक ः मनप्रीत सिंग, चिंगलेनसाना सिंग, सुमित, विवेक सागर प्रसाद. आक्रमक ः आकाशदीप सिंग, एसव्ही सुनील, गुरजात सिंग, मनदीप सिंग, ललीतकुमार उपाध्याय, दीलप्रीत सिंग.

आशिया कप स्पर्धेतील कामगिरीपासूनची खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन संघाची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही स्पर्धांत विविध पर्याय तपासून बघितले आहेत. त्यातूनच राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचा सर्वोत्तम संघ निवडण्यात आला आहे. 
- शूअर्ड मरीन, भारतीय मार्गदर्शक

गेल्या दोन स्पर्धेत भारताने उपविजेतेपद जिंकले आहे. त्यापेक्षा सरस कामगिरीचेच लक्ष्य आहे; मात्र सुरवातीस गटसाखळीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. गटात अव्वल येणे महत्त्वाचे आहे. बाद फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत सर्वांत आव्हानात्मक असेल.
- मनप्रीत सिंग, भारतीय कर्णधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news hockey india sardar singh