esakal | कॅरेन खाचानोवला हरवून रॉजर फेडरर अंतिम फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

Roger Federer

कॅरेन खाचानोवला हरवून रॉजर फेडरर अंतिम फेरीत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

हॅले (जर्मनी) : अग्रमानांकित स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने हॅले ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने रशियाचा प्रतिभाशाली तरुण प्रतिस्पर्धी कॅरेन खाचानोव याला 6-4, 7-6 (7-5) असे हरविले.

फेडररने 11व्या वेळी या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. त्याने आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. फेडररने क्‍ले कोर्ट मोसमात पूर्ण ब्रेक घेतला. विक्रमी आठव्या विंबल्डन विजेतेपदावर त्याने लक्ष केंद्रित केले आहे.

स्टुटगार्टमधील स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तो हरला. या स्पर्धेत मात्र त्याने कामगिरी उंचावली आहे. आतापर्यंत त्याने एकही सेट गमावलेला नाही. पहिल्या दोन गेममध्ये दोघांनी एकमेकांची सर्व्हिस भेदली होती, पण त्यानंतर फेडररने आणखी एक ब्रेक मिळविला. त्याने दुसऱ्या सेटपॉइंटवर आघाडी घेतली. त्याने कॅरेनला नेटजवळ येण्यास भाग पाडले.

दुसऱ्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना कॅरेनची फोरहॅंड व्हॉली नेटमध्ये गेली. त्यामळे फेडररला दोन ब्रेकपॉइंट मिळाले. त्याने ही संधी साधली. मग मात्र सर्व्हिस राखण्याची गरज असताना त्याला ब्रेकला सामोरे जावे लागले. कॅरेनने 6-5 अशा स्थितीस दोन सेटपॉइंटही मिळविले होते, पण फेडररने हा सेट टायब्रेकमध्ये घालविला. पहिल्याच मॅचपॉइंटवर फेडररने विजय नक्की केला.

loading image