फेडरर, जोकोविचची थाटात सलामी

पीटीआय
बुधवार, 17 जानेवारी 2018

मेलबर्न - वाढत्या वयातही युवा खेळाडूंनाही लाजवेल अशा थाटात खेळणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी गेल्यावर्षी दुखापतींमुळे कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टॅन वाव्रींका आणि नोव्हाक जोकोविच यांनीही यशस्वी पुनरागमन केले. महिला विभागात माजी विजेत्या पेट्रा क्विटोवाला पराभवाचा सामना करावा लागला. 

गतविजेत्या रॉजर फेडररने आपल्या विजयी मालिकेस सुरवात केली. पहिल्या फेरीत त्याने स्लोवेनियाच्या अल्जाझ बेडेने याच्यावर ६-३, ६-४, ६-३ असा सहज विजय मिळविला. फेडररचा आजचा खेळ त्याच्या श्रेष्ठत्वाची साक्ष देणाराच होता. तो म्हणाला, ‘‘हे वर्षदेखील चांगले ठरावे अशी आशा आहे. पण, एक नक्की की वाढते वय बघता मी विजेतेपदाच्या शर्यतीत नक्की नाही.’’ 

दिगज्जांचे यशस्वी पुनरागमन
गुडघादुखीतून आपण बरे झाल्याचे स्टॅन वाव्रींका याने पहिली फेरी जिंकून सिद्ध केले. त्याने लिथुआनियाच्या रिचर्डस बेरांकिस याचा ६-३, ६-४, २-६, ७-६(७-२) असा पराभव केला. यशस्वी पुनरागमन झाल्याचा आनंद असला, तरी अजूनही शंभर टक्के बरा झालेलो नाही. अजून वेदना जाणवत आहेत, असे वाव्रींकाने सामन्यानंतर सांगितले. दुखापतीने जोकोविच सहा महिने खेळू शकला नव्हता. पुनरागमन करताना त्याला या वेळी १४ वे मानांकन असणाऱ्या जोकोविचने अमेरिकेच्या डोनाल्ड यंगला टेनिसचे धडे देत ६-१, ६-२, ६-४ असा विजय मिळविला. जोकोविचचा आजचा खेळ निश्‍चितच त्याच्या लौकिकास साजेसा असाच होता. संपूर्ण लढतीत त्याने यंगची सर्व्हिस सहा वेळा भेदली. 

क्विटोवा अपयशी
दोनवेळची विंबल्डन विजेती पेट्रा क्विटोवा आपल्यावरील चाकू हल्ल्यानंतर एक वर्षाने कोर्टवर परतली. मात्र, तिचे पुनरागमन अपयशी ठरले. मॅरेथॉन लढतीत जर्मनीच्या आंद्रेआ पेटकोविच हिने तिचा ६-३, ४-६, १०-८ असा पराभव केला. माजी विजेत्या मारिया शारापोवाने जर्मनीच्या तात्याना मारिया हिचा ६-१, ६-४ असा पराभव केला. एंजेलिक केर्बर हिने पहिल्या फेरीत जर्मनीच्या ॲना लेना फ्रिएडसम हिच्यावर ६-०, ६-४ असा सहज विजय मिळविला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news tennis roger federer Novak Djokovic