सलामीवीर शिखर धवनचे शतक

पल्लीकल - के. एल. राहुल अर्धशतकानंतर अभिवादन करताना. तर दुसऱ्या छायाचित्रात श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शतकानंतर ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांना खास शैलीत अभिवादन करताना भारताचा फलंदाज शिखर धवन.
पल्लीकल - के. एल. राहुल अर्धशतकानंतर अभिवादन करताना. तर दुसऱ्या छायाचित्रात श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात शतकानंतर ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांना खास शैलीत अभिवादन करताना भारताचा फलंदाज शिखर धवन.

राहुलसह विक्रमी सलामी; फलंदाजांची घोडदौड फिरकीने रोखली
पल्लीकल - शिखर धवनचे शतक आणि त्याने ‘विक्रमी’ के. एल. राहुलबरोबर केलेल्या मोठ्या भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जबरदस्त सुरवात केली. धवनने शतक (११९) आणि राहुलसह (८५) १८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय फलंदाजांची घोडदौड पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी पाच फलंदाजांना बाद करून रोखली. पहिल्या दिवशीच्या खेळात भारतीय संघाने ६ बाद ३२९ धावसंख्या उभारली. यजमान संघाने सलामीच्या भागीदारीनंतर सहा फलंदाजांना बाद करताना जोरदार पुनरागमन करून स्थानिक प्रेक्षकांना खूष केले. 

नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहली तिसऱ्यांदा नशीबवान ठरला. भारतीय संघात अपेक्षेप्रमाणे कुलदीप यादवचा समावेश झाला. श्रीलंकन संघात तीन बदल केले गेले. पल्लीकलच्या मस्त खेळपट्टीवर धवन-राहुलने अगदी सहज फलंदाजी चालू केली. दोघा फलंदाजांना मोठ्या मैदानात चेंडू मारून धावा जमा करताना कोणतीच अडचण येत नव्हती. मोठा फटका मारायच्या प्रयत्नात राहुलचा उडालेला झेल श्रीलंकन खेळाडूने सोडला तेव्हा तो फक्त २६ धावांवर खेळत होता. धवनने पहिल्या कसोटी प्रमाणे चौकारांचा सपाटा लावला. ४५ चेंडूतच धवनने अर्धशतकी मजल मारली. पाठोपाठ राहुलचे अर्धशतक झाले. उपहाराअगोदर दोघांनी भागीदारीचा १३० धावांचा टप्पा ओलांडला होता.

धवनने शतकी मजल मारताना १५ चौकार मारले होते. शतकानंतर पॅव्हेलीयनकडे बघून नेहमीच्या थाटात दोनही हात फैलावत धवनने आनंद साजरा केला. सहज शक्‍य असलेले शतक राहुलने हवेतून फटका मारायच्या नादात गमावले. ८५ धावांवर खेळत असताना पुष्पकुमाराचा चेंडू मारताना राहुल मिडऑनला झेल देऊन बाद झाला. पहिले यश श्रीलंकन गोलंदाजांना १८८ धावा दिल्यावर हाती लागले. 

भारतीय फलंदाज दादागिरी करणार वाटत असताना पुष्पकुमारा आणि संदकन या दोन फिरकी गोलंदाजांनी खूप टिच्चून मारा केला. शिखर धवन ११९ धावांवर बाद झाल्यावर मधल्या फळीतील फलंदाजांना दोन फिरकी गोलंदाजांनी कठीण प्रश्‍न विचारले. पुजारा, रहाणे आणि कोहली फार मोठे योगदान न देता तंबूत परतले. १ बाद २१९ धावसंख्येवरून भारतीय धावफलकाची अवस्था ५ बाद २९६ झाली. खेळ थांबायला तीन षटके बाकी असताना अश्‍विनला फर्नांडोने बाद केले. साहा आणि पंड्यासह तळातील फलंदाज धावसंख्या किती वाढवू शकतात हे बघायला दुसऱ्या दिवशी मजा येणार आहे.

धावफलक
भारत - पहिला डाव - शिखर धवन झे. चंडिमल गो. पुष्पकुमारा ११९-१२३ चेंडू, १७ चौकार, के. एल. राहुल झे. करुणारत्ने गो. पुष्पकुमारा ८५-१३५ चेंडू, ८ चौकार, चेतेश्‍वर पुजारा झे. मॅथ्यूज गो. संदकन ८, विराट कोहली झे. करुणारत्ने गो. संदकन ४२-८४ चेंडू, ३ चौकार, अजिंक्‍य रहाणे त्रि. गो. पुष्पकुमारा १७, आर. अश्‍विन झे. डीकवेला गो. फर्नांडो ३१, वृद्धिमान साहा खेळत आहे १३, हार्दिक पंड्या खेळत आहे १, अवांतर १३, एकूण ९० षटकांत ६ बाद ३२९
बाद क्रम - १-१८८, २-२१९, ३-२२९, ४-२६४, ५-२९६, ६-३२२.
गोलंदाजी - विश्‍वा फर्नांडो १९-२-६८-१, लाहिरू कुमारा १५-१-६७-०, दिमुथ करुणारत्ने ५-०-२३-०, दिलरुवान परेरा ८-१-३६-०, लक्षण संदकन २५-२-८४-२, मलिंदा पुष्पकुमारा १८-२-४०-३

के. एल. राहुलचे कसोटीत सलग सातव्या डावात अर्धशतक.
अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय.
राहुल द्रविड आणि गुंडाप्पा विश्वनाथ यांचा सलग प्रत्येकी सहा अर्धशतकांचा उच्चांक मागे टाकला.

वेस्ट इंडीजचे एव्हर्टन विक्‍स, शिवनारायण चंदरपॉल, झिंबाब्वेचा अँडी फ्लॉवर व ऑस्ट्रेलियाचा ख्रिस रॉजर्स यांच्या पंक्तीत विराजमान.

धवन-राहुलची श्रीलंकेत प्रतिस्पर्धी संघाकडून विक्रमी सलामी. आधीचा १७१ धावांचा उच्चांक १९९३ मध्ये भारताच्याच मनोज प्रभाकर-नवज्योत सिद्धू यांचा.

परदेशात एका मालिकेत एकापेक्षा जास्त शतके काढणारा धवन तिसराच भारतीय. सुनील गावसकर यांच्याकडून पाच वेळा, तर राहुल द्रविडकडून दोन वेळा अशी कामगिरी.

कसोट मालिकेत किमान ३०० चेंडूंचा सामना केलेल्या फलंदाजांमध्ये धवनचा १०४.६७ स्ट्राईक रेट तिसऱ्या क्रमांकाचा. २०१५-१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सचा १०९.०१, तर २००९-१० मध्ये श्रीलंकेविरुद्ध विरेंद्र सेहवागचा १०८.१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com