esakal | कोहलीच्या शतकानंतरही आफ्रिका सुस्थितीत
sakal

बोलून बातमी शोधा

कोहलीच्या शतकानंतरही आफ्रिका सुस्थितीत

कोहलीच्या शतकानंतरही आफ्रिका सुस्थितीत

sakal_logo
By
सुनंदन लेले

सेंच्युरियन - विराट कोहलीच्या दमदार दीडशतकी खेळीचा दिलासा भारतीय संघाला मिळाला असला तरी, दुसऱ्या कसोटीत अखेरच्या सत्रात अपुऱ्या प्रकाशानेच दिवसाच्या खेळाची सांगता झाली. तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने २ बाद ९० अशी मजल मारून आपली स्थिती भक्कम केली होती.

कोहलीच्या १५४ धावांच्या खेळीमुळे भारताला दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ३०८ धावांची मजल मारता आली. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सनसनाटी सुरवात झाल्यानंतर आधी पाऊस आणि नंतर अपुरा प्रकाश यामुळे दोन वेळा खेळात व्यत्यय आला. दुसऱ्यांदा खेळ थांबला तेव्हा अजून २७ षटकांचा खेळ बाकी होता. दक्षिण आफ्रिकेने २ बाद ९० धावा करून आपली आघाडी ११८ धावांपर्यंत वाढवली होती. एबी डिव्हिलर्स ५०, तर डीन एल्गार ३६ धावांवर खेळत होते.

त्यापूर्वी, कर्णधार विराट कोहलीने केलेल्या दीडशतकी खेळीने भारताला पहिल्या डावात तीनशेचा टप्पा ओलांडता आला. संघाला गरज असताना दर्जेदार गोलंदाजी आणि परीक्षा बघणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीने नेटाने केलेली फलंदाजीच भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरली. 

मॉर्केल, फिलॅंडर, रबाडा आणि एन्गिडी यांच्यासारख्या कसलेल्या गोलंदाजांसमोर कोहलीने दीडशतकी खेळी करून संघाला यजमानांच्या धावसंख्येच्या बरोबरीची अपेक्षा दाखवली होती. मात्र, त्याचे जोडीदार त्याच्याबरोबरीने उभे राहू शकले नाहीत. भारतीय फलंदाज पुन्हा चुका करून बाद झाले. 

संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका ३३५ आणि २ बाद ९० (डिव्हिलर्स खेळत आहे ५०, डीन एल्गार खेळत आहे ३६, बुमरा २-३०) भारत पहिला डाव (९२.१ षटकांत) ३०८ (विराट कोहली १५३ -२१७ चेंडू, १५ चौकार, आर. अश्‍विन ३८, मुरली विजय ४६, मॉर्ने मॉर्केल ४-६०).

विराट शतक
आफ्रिकेत शतक करणारा कोहली हा दुसरा भारतीय कर्णधार. यापूर्वी ही कामगिरी सचिन तेंडुलकरची (१६९).
ही कामगिरी करणारे भारतीय उपखंडातील दोघेच.
कोहलीचे हे २१ वे शतक; तर आफ्रिकेतील दुसरे.
कोहलीचे हे एकंदरीत ५३ वे आंतरराष्ट्रीय शतक.
२०१६ पासून कोहलीची शतके ः २००, २११, १६७, २३५, २०४, १०३ नाबाद, १०४ नाबाद, २१३, २४३.
विराटचे परदेशातील १० वे शतक (५२ डावांत). भारतातील ५७ डावांत ११ शतके.
भारताचे नेतृत्व करताना एकंदरीत १४ शतके. त्यातील सात भारताबाहेर (२२ डावांत); तर भारतात ३२ डावांत ७. 
२०११ पासून कोहलीची परदेशांत ११ शतके; तर स्मिथची १०.

loading image
go to top